इलेक्ट्रिक वाहनांना आगी: वाहने खरेदी करण्याची घाई नकोच

0
डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने वाहन ग्राहक पर्यायी इंधन आणि वाहनांच्या शोधात आहे. इलेक्ट्रिक वाहनांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नव्हे ही वाहने खरेदी करण्याकडे शहरी ग्राहकांचा ओढा वाढला आहे. मात्र याच इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागण्याच्या आणि बॅटरीच्या स्फोटांच्या वारंवारच्या घटनांने ग्राहक संभ्रमितही झाला आहे. त्यामुळे साहजिकच या वाहनांच्या खरेदीला काहीशी खिळही बदली आहे. वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा ग्राहकांनी चांगलाच  धसका घेतला असून बातम्यांनुसार मागील आठवड्याभरात  मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील ३० टक्के  ग्राहकांकडून ई-स्कूटरच्या बुकिंग रद्द केल्याची  माहिती समोर आली आहे. आणखी काही काळ थांबून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करूया, असा विचार ग्राहक करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार किंवा अन्य सर्व्हेक्षणांच्या अंदाजानुसार या वाहनांचा उठाव म्हणावा तसा होणार नाही,हे उघड आहे.

 

साहजिकच सरकारे आणि कंपन्या यांनी या वाहनांवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर नियम व अटी कडक करण्याचीही आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहने घाईगडबडीत रस्त्यावर आणणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यावर अधिक काम होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच पुण्यात माहिती देताना सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांत विजेवर चालणार्‍या वाहनांच्या खपात तब्बल 1300 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या 12 लाख विजेवर चालणारी वाहनं आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा 40 लाखांपर्यंत जाईल. तर येत्या दोन वर्षात ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल.

 

त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात खूप वाव असून या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं मत  त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ई-बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सज्जड दमही दिला आहे.मागील काही महिन्यांपासून देशातील विविध भागात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना फॉल्टी स्कूटर रिकॉल करण्याचे आदेश दिले होते. तर जोपर्यंत इलेक्ट्रक स्कूटरला का आग लागत आहे? याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन स्कूटर, बाईकचे लाँचिंग थांबविण्यास या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार सर्वत्र या गाड्यांचे उत्पादन तसेच विक्री थांबली आहे.

 

इलेक्ट्रिक वाहनांच्या गुणवत्तेबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, त्यासोबतच निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करत भीतीपोटी बहुतांश शहरातील ग्राहकांनी ३ ते ४ महिने आधी केलेल्या बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरात सर्वाधिक ३० टक्के ग्राहकांकडून ईस्कूटरच्या बुकिंग रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी
आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये
दोष आढळल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे.
ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र
ईव्ही आणि ओला इलेक्ट्रिक यांच्या ई-स्कूटर्समधील
ईव्ही आग आणि बॅटरी स्फोटाच्या घटना लक्षात घेऊन
Rate Card
स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल दिला आहे.
दरम्यान, ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या
वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही
उत्पादकांशी संपर्क साधत उपाय सुचवणार आहेत.
त्याचबरोबर विजेवर चालणार्‍या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेनं पर्यायी अँल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, अँल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झाले आहे. परिणामी आगामी काळात विजेवर चालणार्‍या वाहनांना खूप वाव असल्याचं श्री. गडकरी म्हणतात. मात्र यासाठी कंपन्यांनी वेगाने काम करताना काळजीही घ्यावी लागणार आहे.

 

अलीकडच्या दोन तीन वर्षांत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरल्या.मात्र आज अशाच कंपन्यांच्या वाहनांना बॅटरी बदलताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना बॅटऱ्या उपलब्ध होताना दिसत नसल्याने परिणामी ग्राहकांना आर्थिक घाटयाला सामोरे जावे लागत आहे.

 

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.