पुणे : केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात येत असलेल्या आवश्यक सुधारणामुळे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२० व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक व अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनखाली नव्या शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. केंद्राने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर देशातील पहिली प्राध्यापक प्रबोधिनी पुणे येथे स्थापन झाली. इन्फोसिससारख्या संस्थेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या संपूर्ण प्रक्रीयेत विद्यापीठाचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यापीठ आणि शासनाने समन्वीत प्रयत्न केल्यास राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल बदल घडवून आणता येतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अन्या विद्यापीठांना अनुकरण करण्यासारख्या चांगल्या बाबी आहेत. विद्यापीठाने इतरही देशातील विद्यापीठांशी करार केला आहे. प्रत्येक विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम बाहेरच्या देशात जाईल यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यानिमित्ताने आपले ज्ञान, संस्कृती इतर देशात जाते, असेही ते म्हणाले.
राज्यातील विद्यापीठांनी पदवीप्रदान समारंभासाठी एक दिवस निश्चित करावा आणि एकाच दिवशी राज्यातील सर्व विद्यापीठात हा समारंभ व्हावा. यामुळे एका दिवशी लाखो पदव्या देणारे राज्य म्हणून राज्याची ओळख होईल. इतरही विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभापासून प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांना पदवीदान कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. कुलगुरु डॉ.करमळकर यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळा आदर्श उभा केला आहे, असे ते म्हणाले.
मराठी भाषेच्या विकासासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. येत्या वर्षभरात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला गती देण्याचे काम करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.सामंत यांनी दिली.
डॉ.पटवर्धन म्हणाले, गुरुकुल आणि कुलगुरु पद्धती या दोन्हीमधील चांगल्या गोष्टी घेऊन नवा मार्ग स्विकारण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून, त्याविषयी माहिती घेऊन पुढे जावे लागेल. विश्वासावर आधारीत शैक्षणिक पद्धती आपल्याला विकसीत करावी लागेल. विद्यापीठात अधिकाधिक उत्तम शिक्षक येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारताची जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता आहे. जगातील पहिली विद्यापीठे भारतात सुरू झाली. त्यामुळे आपल्या विद्यापीठांचे सक्षमीकरण करून आपल्या गरजेवर आधारीत शिक्षण पद्धती विकसीत करावी लागेल. तंत्रज्ञानामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत, यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राने सुरू केलेली प्राध्यापक प्रबोधिनी महत्वाची आहे. महाराष्ट्र देशाला नेतृत्व देणारे राज्य आहे. ही क्षमता शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. ती क्षमता पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुणे विद्यापीठ जगात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरु डॉ.करमळकर म्हणाले, कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचे मूळ कारण शिक्षित व कौशल्य स्वयंपूर्ण मनुष्यबळात असते. या अर्थाने विद्यार्थी भारताच्या विकासाचे रचनाकार आहेत. २१ वे शतक ज्ञानाचे आणि ज्ञानाधिष्ठीत संपत्तीचे आहे. ज्ञानातून संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने कौशल्य विकासावर भर दिला आहे.
विद्यापीठ ज्ञान आणि कौशल्य विकासाच्या नव्या प्रवाहाशी जोडले गेल्याने राष्ट्रीय पातळीवरील मानांकनात तंत्र विद्यापीठ नसताना पुणे विद्यापीठाला आठवे मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाने उद्योग संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेचा विकास आणि रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी अशा नव्या ज्ञानप्रवाहाशी जोडले जावे. संशोधनाच्या क्षेत्रात पुढे येताना आपल्या संस्कृतीचेही जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दीक्षांत मिरवणूकीने कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभात ७५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. शैक्षणिक वर्ष एप्रिल /मे २०२१ या वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएचडी, एमफील, स्तरावरील एकूण १ लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १० एमफील आणि ३०९ पीएचडीधारक आहेत.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरुंच्या हस्ते आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या रेणुका जगतपती सिंग यांना द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.