पश्चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित | ५ लाख ६० हजार ग्राहकांना पुनर्वीजजोडणी संधी | ‘विलासराव देशमुख अभय योजने’तून मिळणार १५६ कोटींची सवलत

0

पश्चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित

५ लाख ६० हजार ग्राहकांना पुनर्वीजजोडणी संधी

‘विलासराव देशमुख अभय योजने’तून मिळणार १५६ कोटींची सवल

पुणे, दि. १३ मे २०२२: पश्चिम महाराष्ट्रातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या लघु व उच्चदाब वर्गवारीतील ५ लाख ६० हजार ८२५ अकृषक ग्राहकांना ‘विलासराव देशमुख अभय योजने’मधून पुनर्वीजजोडणीची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांनी ७४७ कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना १५५ कोटी ९२ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत या योजनेची मुदत आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील १३०६ वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांसाठी थकबाकीमुक्तीसह वीजजोडणी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केली आहे. तर कृषी ग्राहकांना यापूर्वीच ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०’ मधून थकबाकीमुक्तीची संधी देण्यात आली आहे.

Rate Card

‘विलासराव देशमुख अभय योजने’त सहभागी होऊन मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार आहे. तर मूळ थकबाकी भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय असून त्यासाठी ३० टक्के थकबाकीचा भरणा करून योजनेत सहभाग घेणे आवश्यक आहे. हप्त्यांनी मूळ थकबाकी भरीत असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा सुरु केल्यानंतर चालू बिलाच्या रकमेसोबत हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य आहे. ग्राहकांनी उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली नाही तर माफ केलेल्या व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होणार आहे. आतापर्यंत या योजनेत पुणे जिल्ह्यातील ८१७, सातारा- १२०, सोलापूर- १६६, कोल्हापूर- ९९ आणि सांगली जिल्ह्यातील १०४ असे एकूण १३०६ ग्राहकांनी सहभाग घेतला आहे.

या योजनेनुसार पुणे जिल्ह्यातील लघु व उच्चदाब वर्गवारीतील २ लाख ९१ हजार ७०४ ग्राहकांनी मूळ थकबाकीच्या ४९४ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे ८५ कोटी ४५ लाख रुपयांची माफी मिळेल. सातारा जिल्ह्यातील ४७ हजार ५०८ ग्राहकांनी ३७ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे ५ कोटी ३७ लाख रुपयांची माफी मिळेल. सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८६१ ग्राहकांनी ९४ कोटी रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे १८ कोटी ६९ लाख रुपयांची माफी मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार ७०३ ग्राहकांनी ६३ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केल्यास २१ कोटी ३६ लाख रुपयांची तर सांगली जिल्ह्यातील ४६ हजार ४९ ग्राहकांनी ५७ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे २५ कोटी ६१ लाख रुपयांची माफी मिळणार आहे.

महावितरणने थकीत रकमेच्या वसूलीसाठी कोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना वरील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा  ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रियाचा खर्च) देणे अत्यावश्‍यक आहे. जर ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजजोडणी सध्या आहे त्याच ठिकाणी वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यात येईल. मात्र संबंधित ग्राहकांना नियमाप्रमाणे नवीन वीजजोडणी घ्यावी लागेल किंवा पुनर्विजजोडणी शुल्क भरावे लागेल. थकीत वीजबिलासंबंधी न्यायालयाने महावितरणच्या बाजूने आदेश दिलेला असेल तसेच त्यास १२ वर्षाच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने अपील फाईल केले नसेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल. ही योजना फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.