हेरवाडचा आदर्श निर्णय       

0
महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य समजले जाते. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला कायम  पुरोगामी विचार दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक  साधू  – संत आणि महापुरुषांनी समतेचा विचार समाजात रुजवला. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि रूढी परंपरांच्या विरोधात लढणारे अनेक महापुरुष याच मातीत जन्मले. या मातीला परंपरा आणि पुरोगामीत्वाचा मोठा वारसा आहे. आजच्या नव्या पिढीतही हा वारसा कायम आहे हे दाखवून देणारे आदर्श काम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केले आहे. हेरवाड ग्रामपंचायतिने ४ मे रोजी एक ठराव केला या ठरावानुसार या गावात आता पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना मिळणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विधवा प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढले जाते. त्यांच्या बांगड्या फोडल्या जातात.

 

त्यांच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते. पायातील जोडवी काढली जातात. अंगावरील दागिने काढले जातात. कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यास सहभागी होण्यास बंदी घातली जाते. शुभ कार्यात हीन वागणूक दिली जाते. विधवा महिलांना दिली जाणारी ही वागणूक म्हणजे एकप्रकारे तिचा अपमानच आहे. महिलांना मिळणारी ही वागणूक क्रूर पद्धतीची आहे. ज्या महिलांना लक्ष्मी, दुर्गा मानून पूजा केली जाते त्याच महिलांना पतीच्या निधनानंतर अशी हीन वागणूक दिली जाते. या वागणुकीमुळे पतीच्या निधनानंतर आधीच दुःखात असणारी स्त्री आणखी दुःखी होते. समाजात,  सार्वजनिक ठिकाणी या महिला मर्यादा ओळखूनच वावरतात मात्र जर एखाद्या महिलेने ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तथाकथित सांस्कृतिक रक्षक या महिलांच्या नावे बोटे मोडतात असे असतानाही हेरवाड ग्रामपंचायतीने हे ऐतिहासिक धाडसी पाऊल उचलले आहे.

 

याबद्दल या ग्रामपंचायतीचे व सर्व ग्रामस्थांचे अभिनंदनच करायला हवे. हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे केवळ राज्यातच नव्हे तर देशातील  सर्व ग्रामपंचायतीने अनुकरण करायला हवे. विशेष असे की महिलांच्या उद्धारासाठी  कार्य करणारे समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांची १०० वि पुण्यतिथी साजरी होत असताना हेरवाड ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे त्यांनी शाहू महाराजांना आदर्श अशी श्रद्धांजली वाहिली आहे.  हा निर्णय केवळ एका ग्रामपंचायतीपुरते मर्यादित न राहता ती आता लोकचळवळ बनायला हवी. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने हेरवाड ग्रामपंचायतीप्रमाणे ठराव करावा तो ठराव राज्य सरकारकडे पाठवावा. राज्य सरकारनेही असा विधानसभेत असा ठराव करुन तो संपूर्ण राज्यात लागू करावा. काळ बदलला तसे  कालानुरूप जुन्या अनिष्ठ परंपरा हद्दपार व्हायला हव्यात.

 

तशा अनेक अनिष्ठ प्रथांना आपण याआधी मूठमाती दिली आहे. पतीच्या निधनानंतर पतीच्या सरणावरच पत्नीला जाळून मारणारी अमानवी सतीची चाल बंद झाली. केशवपन ही देखील अशीच अमानवी पद्धत कालानुरूप बंद झाली अर्थात त्यासाठी समाज सुधारकांना समाजात खुल प्रबोधन करावे लागले प्रसंगी समाजाचा रोषही पत्करावा लागला मात्र समाज सुधारणेचे व्रत  हाती घेतल्याने आणि विधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी समाज सुधारकांनी जे प्रयत्न केले त्याचे फलित म्हणजे या प्रथांचे उच्चाटन झाले.   उद्या जर हेरवाड ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व ग्रामपंचायतीने  अनुकरण केले तर या अनिष्ठ प्रथाही समाजातून  कायमच्या  हद्दपार होतील.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.