बुद्ध पौर्णिमा

0
आज १६ मे, आज वैशाख पौर्णिमा आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुम्बिनी वनातील शाल वृक्षाखाली  जन्म झाला होता म्हणून वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. ही  तिथी वर्षातील सर्वात पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते.  बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी पवित्र मानली जाते ती म्हणजे याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते म्हणून या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असेही म्हणतात. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नाही तर जगातील १८० हुन अधिक देशात साजरी केली जाते. भारत, चीन, जपान, नेपाळ, भूतान, म्यानमार, थायलंड, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, इंडोनेशिया या देशात तर बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
जगातील सर्व बौद्ध धर्मीय बांधव बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात.  बुद्ध पौर्णिमेला बोध गया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात  आणि प्रार्थना करतात. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथाचे वाचन, पठण केले जाते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध पौर्णिमा साजरी केली गेली. २७ मे१९५३ रोजी भारत सरकारने बुद्ध पौर्णिमेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. आज बुद्ध पौर्णिमेला सार्वजनिक स्वरूप आले आहे.
भारतातील बौद्ध अनुयायी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी बुद्ध विहारे रंगीबेरंगी पताका, फुलांनी सजवली जातात. बौद्ध बांधव यादिवशी गोडधोडाचे जेवण करून आपले मित्र नातेवाईक यांना घरी आमंत्रण देतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्व बौद्ध भिक्षु व  बौद्ध बांधव बुद्ध विहारात एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीजवळ दीपप्रज्वलन करतात. बुद्धांची शिकवण अंगिकारण्याचा संकल्प करतात.
बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याचा निश्चय करतात. गौतम बुद्ध हे भारताचे  सर्वोत्तम भूमिपुत्र आहेत.  तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्या बदलाची पायाभरणी केली. त्याकाळात अंधश्रद्धा, कर्मकांड पाखंड यांनी उच्चांक गाठला होता. गौतम बुद्धांनी यावर प्रहार केला. नरबळी, पशुबळी, अंधश्रद्धा, कर्मकांड यांना त्यांनी कडाडून विरोध केला.
गौतम बुद्धांनी मानव कल्याणाचा उपदेश केला. लोकांमध्ये असलेल्या स्वर्ग,नरक या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना चार आर्यसत्य सांगितली ती चार आर्यसत्य आचरणात आणल्यास मानवाचे जीवन आनंदमय होऊ शकते.
ती चार आर्य सत्य म्हणजे
 १) मानवाला दुःख असते.
 २)दुःखाला कारण असते.
 ३ ) दुःखाचे निवारण करता येते.
 ४) दुःख कमी करण्याचे उपाय आहेत.
मानवी जीवनातील दुःख निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. गौतम बुद्धांनी आयुष्यभर शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग शिकवला. त्यांनी करुणा विकसित करण्याचा आणि समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला. आज बुद्ध पौर्णिमेपासून सर्वांनी  शिलाचे काटेकोरपणे पालन करून आपली काया, वाचा व मनाची कृती निष्कलंक राहील असा संकल्प करावा. सर्व नागरिकांनी तथागत गौतम बुध्दांच्या मार्गाने चालावे. गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग हाच मानव मुक्तीचा मार्ग आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.