मिस यु सायमंडस……!           

0
3

 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोणाची दृष्ट लागली हेच समजेनासे झाले आहे.  ऑस्ट्रेलियाचे एकसे बढकर एक दिग्गज खेळाडू जग सोडून चालले आहेत.  काही दिवसांपूर्वी लेगस्पिनचा बादशहा शेन वार्न हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने गेला. शेन वार्नच्या अनपेक्षित जाण्याने केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रेमीच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून क्रिकेट प्रेमी सावरत नाही तोच आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद खेळाडू अँडरू सायमंडस याचे कार अपघातात निधन झाले. डिन जोन्स,  जेफ मार्श, शेन वार्न आणि आता सायमंडस

 

…ज्या प्रमाणे क्रिकेटमध्ये एक खेळाडू बाद झाला की संघाला गळती लागते आणि  एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होत जातात तसे एका पाठोपाठ एक ऑस्ट्रेलियन खेळाडू जगण्याच्या खेळातून बाद होत चालले आहे. सायमंडस हे नाव माहीत नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. १९९९ ते  २००७ या काळात क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या  या  खेळाडूचा ९ जून १९७५ रोजी जन्म झाला. बर्मिंगहॅम मधल्या  एका दाम्पत्यांकडून त्याच्या ऑस्ट्रेलियन आई वडिलांनी त्याला दत्तक घेतले तेंव्हा तो फक्त तीन महिन्यांचा होता. त्याच्या जन्मदात्या आई वडिलांपैकी कोणीतरी आफ्रिकन होते त्यामुळे तो जन्मताच कृष्णवर्णीय होता मात्र त्याच्या  दत्तक आई वडिलांनी त्याला चांगले सांभाळले. शाळेत असल्यापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. शालेय वयातच त्याने क्रिकेटमध्ये करिष्मा दाखवायला सुरवात केला.

काऊंटी क्रिकेट  सामन्यात त्याने २५४ धावांची तडाखेबंद खेळी केली या खेळीत त्याने तब्बल १६ षटकार मारताना न्यूझीलंडच्या जॉन रिडचा १५ षटकारांचा विक्रम मोडला या खेळीने त्याला ऑस्ट्रेलियन संघात प्रवेश मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन कसोटी संघात प्रवेश मिळाल्यावर त्याने संघासाठी दोन शतके झळकावली. त्यातील एक शतक त्याने भारताविरुद्ध सिडनी येथे झळकावले. त्याच्या याच शतकाने भारताचा विजय हिरावून नेला. याच कसोटीत हरभजनसिंग व त्याच्यात मंकी गेट प्रकरणावरून वाद झाला होता हा वाद विकोपाला जाऊनही जेंव्हा तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळू लागला तेंव्हा त्याची आणि हरभजनसिंगची चांगली मैत्री झाली. सायमंडस हा आक्रमक खेळाडू होता. त्याची बॅट म्हणजे जणू एक हातोडा होता.

 

गोलंदाजांनी टाकलेला बॉल हा केवळ आकाशात भिरकवण्यासाठीच असतो असे तो म्हणायचा त्यामुळेच तो नेहमी कमी चेंडूत जास्त धावा काढायचा. त्याच्या याच खुबीमुळे तो ऑस्ट्रेलियन संघाच्या एकदिवसीय आणि टी २० संघाचा अविभाज्य भाग बनला. २००३  आणि २००७ हे दोन विश्वचषक ऑस्ट्रेलियाला जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. सायमंडस हा केवळ तडाखेबंद फलंदाज नव्हता तर तो एक चांगला गोलंदाज देखील होता. प्रसंगानुरूप तो कधी मध्यमगती तर कधी स्पिन गोलंदाजी करायचा. त्याचे क्षेत्ररक्षण तर अफलातून होते. रिकी पॉंटिंग तर त्याला जोंटी ऱ्होड्स आणि हर्षल गिब्ज पेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानायचा. म्हणजेच तो एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी कम्प्लेट पॅकेज होता. त्याने २४  कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतकासह १४६२ धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यात ६ शतके आणि ३०  अर्धशतकासह ५०८८ धावा केल्या.

 

त्याची कारकीर्द आणखी लांबली असती मात्र काही दुर्गणांमुळे त्याला त्याची कारकीर्द वाढवता आली नाही. अति मद्यपान करणे, मॅच प्रॅक्टिस ऐवजी फिशिंगला जाणे, कर्णधाराशी उद्धटपणे बोलणे असे त्याचे काही दुर्गुण होते. त्याच्या याच दुर्गुणांमुळे त्याचे आणि कर्णधार माईक क्लर्कशी पटेनासे झाले. २००९ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत  त्याने कर्णधार मायकल क्लर्कवर जाहीर टीका केली त्यामुळे त्याला संघातून वगळले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याशी केलेला करारही रद्द केला. तिथेच त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. मात्र तो जितके क्रिकेट खेळला ; मनासारखे खेळला. त्याने त्याच्या कारकिर्दीत मोठमोठे विक्रम केले नाहीत पण आपल्या तडाखेबंद खेळीने क्रिकेट प्रेमींच्या मनात मात्र स्थान मिळवले. आज  जरी तो या जगातून निघून गेला असला तरी   क्रिकेट प्रेमींच्या मनातून त्याचे स्थान मात्र कधीही जाणार नाही. सायमंडसला भावपूर्ण श्रद्धांजली!  मिस यु सायमंडस……!!

 

श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here