मुलांच्या हातात शस्त्रे

0
Rate Card

अमेरिकेतील टेक्सासमधील उबाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूल या प्राथमिक शाळेत एका किशोरवयीन बंदुकधाऱ्याने 24 मे रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.  मृत विद्यार्थी सात ते दहा वर्षे वयोगटातील होती आणि ते दुसरी ते चौथीच्या वर्गात शिकत होते. पोलिसांच्या गोळीबारात  हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.मात्र त्याने केलेल्या गोळीबारात शेकडोजण जखमी झाले आहेत त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. चिमुकल्या मुलांवर बेछूट गोळीबार करणारा केवळ अठरा वर्षांचा होता.

शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याने त्याच्या आजीवरही गोळा झाडल्या असल्याचा संशय व्यक्‍त केला गेला आहे. शाळेत येण्यापूर्वी त्याने त्याच्या मोटारीचा अपघात घडवून आणला. त्यानंतर त्याने रॉब एलिमेंटरी शाळेत बेछूट गोळीबार केला. त्याने गोळीबार का केला याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. या घटनेने अमेरिका हादरून गेली आहे.

गोळीबार करून सामूहिक हत्या करण्याची अमेरिकेतील गेल्या दशकातील ही सर्वात मोठी घटना आहे. कनेक्टिकटमधील न्यूटाऊनमधील सँडी हूक प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारानंतर देशातील शाळेत झालेला भयावह हल्ला आहे. त्यावेळी 20 विद्यार्थी आणि सहा कर्मचाऱ्यांचा बळी गेला होता. 2018 मधील घटनेत फ्लॉरिडातील पार्कलँडमधील शाळेत झालेल्या हल्ल्यात माध्यमिक शाळेतील 14विद्यार्थी व तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. दहा दिवसांपूर्वीच न्यूयॉकयमधील बफेलो येथे एका दुकानात बंदुकाधाऱ्याने केलेल्या गोळीबारात दहाजण ठार झाले होते. अमेरीकेत किंवा परदेशात किशोरवयीन मुलांकडून होत असलेल्या अशा प्रकारच्या घटना चिंताजनक आहेत.  अमेरीकेत शस्त्रबंदीसाठी नागरिकांमध्ये उठाव होत असताना राजकीय पातळीवर मात्र याला पाठींबा मिळताना दिसत नाही.

आजची मुलं एकादी कृती करताना मागचा पुढचा विचारच करताना दिसत नाही. आई-बापाचे तर ते ऐकतच नाही. मग शाळेत शिक्षकांचे तर काय ऐकणार? शिक्षक काही दरडावून बोलला तर त्याला उलट आणि उद्धट उत्तरे दिली जातात. मुलं एवढी बेफिकिर का झाली आहेत,कळायला मार्ग नाही. अर्थात याला संस्कारच कमी पडले आहेत. आजचा तरुण तर खिशात पिस्तुल,चाकूसारखी शस्त्रे घेऊन फिरतो आहे. या तरुणांना स्वामी विवेकानंदपेक्षा दाऊद जवळचा वाटू लागला आहे. त्यामुळे अगदी गावोगावी गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे. कुठे काही खुट्ट झाले तरी तलवारी, काठ्या-कुर्‍हाडी, दगड-धोंडे घेऊन हे एकच कल्ला करताना दिसतात. क्षणात भितीने गाव, शहर बंद! शस्त्रे बाळगलेले तरुण सतत कुठे ना कुठे पोलिसांच्या तावडीत सापडत आहेत. मात्र त्यांचे पुढे काय झाले, याचा पत्ता नाही. त्यांना शिक्षा झाल्याचे ऐकिवात येत नाही. त्यामुळे साहजिकच अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची पिढी गल्लोगल्लीत वाढताना दिसत आहे. वाढती बेकारी, चैन करायची सवय यामुळे या प्रवृत्तीकडे युवकांचा ओढा वाढत चालला आहे. याला राजकारणी लोक खतपाणी घालत आहेत.

आणखी काही वर्षांनी प्रत्येकालाच स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पिस्तुल वापरावे लागेल की काय, अशी भिती वाटू लागली आहे. याकडे वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात बिहार,उत्तर प्रदेशात सर्वाधिक शस्त्रे परवानाधारकांची संख्या अधिक आहे. तिथे फार मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातदेखील शस्त्रे परवाण्यासाठी सातत्याने अर्ज होताना दिसत आहे. ही धोक्याची घंटा आहे.

आपल्या देशात शस्त्र परवानाधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना परदेशात मात्र शस्त्र बंदी करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना शांतता हवी आहे.  आपल्या देशातही शाळांमध्ये अशा घटना घडत आहेत. परदेशात तर अशा घटना सातत्याने घडत आहेत. आता तिथले लोक अशा घटनांना इतके कंटाळले आहेत की, त्यांना शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी करावी लागत आहे. त्यांचे आता एक स्वप्नच आहे की, जग सारे बंदूकमुक्त व्हावे. सध्या या घोषणा अमेरिकेत जागोजागी गाजत आहेत. विशेष म्हणजे अशा घोषणा देत रस्त्यावर उतरणार्‍यांमध्ये किशोर वयीन मुलांची संख्या अधिक आहे. वॉशिंग्टन डी सी, लांस एंजिलस, न्यूयॉर्क इत्यादी मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठी निदर्शने होत आहेत. तिथे ही निदर्शने पाहणारे म्हणतात की, इतकी मोठी निदर्शने वियतनाम युद्धाच्या दिवसांतल्या निदर्शानांचे स्मरण करून देतात. या निदर्शनांमध्ये पार्कलँड, फ्लोरिडामध्ये घडलेल्या बंदूक कांडातून वाचलेले लोकदेखील सहभागी झाले होते. अमेरिकेतल्या लोकांचे म्हणणे असे की, शस्त्रांचा हा विरोध आम्ही आता घरांघरांत घेऊन जाणार आहोत. आणि आम्ही आता अशा लोकांना निवडून देणार, जे शस्त्रांवर बंदी घालतील. आतापर्यंत ज्यांना ज्यांना निवडून दिले, ते आम्हाला वाचवू शकत नाहीत.या घटनेनंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी अशा घटना घडू नयेत म्हणून नवीन गन पॉलिसी आणण्याची मागणी केली आहे

दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्या शाळेत संस्कार शिकवला जातो किंवा दिले जातात, त्याच पवित्र शाळांमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. कुठलेही सरकार असेल किंवा कुठल्याही पक्षाचे सरकार, ते अशा प्रकारची हिंसा रोखण्यात अपयशी ठरले आहेत. या मोर्चात अगदी नऊ-नऊ वर्षांची मुलंदेखील सहभागी होती. मार्टिन लुथर किंग ज्युनिअर यांची नऊ वर्षांची नातदेखील सहभागी होती. योलांडा रीनी किंग म्हणते की, आता खूप झाले. माझे स्वप्न आहे की, हे जग बंदूकमुक्त व्हायला हवे. या निदर्शनात अभिनेता जॉर्ज क्लूनी, मिडियाची मोठी हस्ती ओपरा विनफ्रे, प्रसिद्ध दिग्दर्शक स्पीलबर्ग आणि अनेक प्रसिद्ध लोकांनी भाग घेतला होता.

अमेरिकेत शस्त्रे बनवणारे आणि त्यांचे समर्थन करणारे यांची लॉबी इतकी बळकट आहे की, सरकारेदेखील त्यांच्यापुढे विवश होताना दिसतात. अमेरिकेतील परिस्थिती अशी आहे की, मुलं आपल्या दप्तरात रिवाल्वर घेऊन जातात आणि पाहिजे त्यावेळा आपल्या सहकार्‍यावर हल्ला करतात. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात पार्कलँड,फ्लोरिडाच्या शाळेमध्ये 19 वर्षांच्या निकोलस क्रूज या किशोरवयीन मुलाने चौदा वर्षांच्या मुलांना गोळ्या झाडून मारले.यात आणखी तीन मोठे लोक मारले गेले.

शाळांमध्ये अशा प्रकारच्या घडणार्‍या घटना मोठ्या भीतीदायक आहेत. अमेरिकेत आई-वडीलदेखील मुलांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी आपली चिंता व्यक्त करीत असतात. पण सरकारे आणि राजकीय पक्ष शोक व्यक्त करण्यापलिकडे काहीच करताना दिसत नाहीत. आपल्या देशात शाळांमध्ये घडणार्‍या घटना चिंताजनक आहेत.पण आपल्या इथे अमेरिकेसारखी नेहमी अशा प्रकारे मुले शस्त्रे घेऊन शाळेत जात नाहीत. मात्र हिंसा वाढत चालली आहे, यात शंका नाही. अशा किती घटना आपल्याला रोज ऐकायला मिळतात, की आपल्यासोबत एकाद्या मुला-मुलीला खूपच किरकोळ गोष्टींवर त्याच्या सहकारी किंवा मित्रांना मारून टाकतात.  गुरुग्राममध्ये एका मुलाला त्याच्याच शाळेत शिकणार्‍या किशोरवयीन मुलाने परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणून मारून टाकले. आणखी एका मुलीने दुसर्‍या मुलांसोबत असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला.

 तंत्रज्ञानाने जिथे मुलांना जगाशी जोडले,तिथे ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले. मात्र हेच तंत्रज्ञान त्यांना हिंसा आणि यौन अत्याचाराचे धडेही देऊ लागले आहे. मोठ्या संख्येने मुले पॉर्न आणि अशाप्रकारच्या साइट्स पाहात आहेत, जे त्यांना यौन गुन्हेगारीसाठी प्रेरित करत आहे. मुंबईत एका नऊ वर्षांच्या मुलाने एका लहान मुलीसोबत दुष्कर्म केले होते. त्याला त्याच्या गुन्ह्याचा अर्थदेखील माहित नसावा. मुले अशा प्रकारच्या मारामार्‍या किंवा अत्याचार का करत आहेत, यावरदेखील अगदी खोलवर संशोधन किंवा अभ्यास होताना दिसत नाही. अमेरिकेत मुले आणि किशोरवयीन मुले ज्या प्रकारची काळजी व्यक्त करताना दिसतात , त्या प्रकारे कमीत कमी आपण मोठी माणसे तरी अशा घटनांमधून बोध घेऊ शकतो, कारण आपल्याकडे परवाना घेतलेली हत्यारे नसतीलही,पण देशी कट्टे आणि बंदुका मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे याला आळा घालण्याची आपली फार मोठी जबाबदारी आहे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 9423368970

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.