वीजबिलासाठी १.१६ लाखांवर ग्राहकांकडून कागदाचा वापर पूर्णतः बंद

0
Rate Card
पुणे : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख १६ हजार २४३ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीजबिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच प्रतिबिल १० रुपये सवलत देखील देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ८० हजार ९१६, सातारा- ८५११, सोलापूर- ८६१५, कोल्हापूर- १० हजार ९५ आणि सांगली जिल्ह्यात ७२८६ वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षभरात ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ३१ हजार २०० वीजग्राहकांचा सहभाग वाढला आहे. महावितरणची पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तात्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.