सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे, कराड पंढरपूर महामार्गावर बोरवेल वाहतूक करणारा ट्रक आणि शेती संबंधीत साहित्य पोहचविण्यासाठी आलेला मिनी टेम्पोची जोराच्या धडकेत दोघांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात झालेले तिघेही कोरेगाव येथील रहिवासी होते. त्यांचे शेतकरी कृषी यंत्र नावाचे दुकान आहे. दुकान साहित्य पोहोचवण्यासाठीच ते या भागात आले होते. मात्र, परत जात असताना गावच्या नजीकच असणाऱ्या एका वळणावरती ट्रक आणि मिनी टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
या धडकेत मिनी टेम्पोमध्ये त ३ जण पुढे बसले होते त्यामुळे त्यांना अतिशय गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं. आटपाडी आणि मायणी येथील रुग्णवाहिकेतून एकाला आटपाडी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा, तर दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यु झाला. निशांत फडतरे हा सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे. महेश फडतरे व गणेश फडतरे अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.