पुढील वर्षीचे राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन संखमध्ये – तुकाराम बाबा महाराज
★ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बागडेबाबा मानव मित्र संघटना सदैव सज्ज
जत, संकेत टाइम्स : बळीराजा सक्षम झाला तरच देशाची उभारणी भक्कम होणार आहे. राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलनातून विचारमंथन तर होतेच त्याचबरोबर बळीराजाचे प्रश्न ही मार्गी लावण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण होते. पहिले बळीराजाचे संमेलन तासगावमध्ये पार पडले असून दुसरे राष्ट्रीय साहित्य संमेलन जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात घेण्यात येणार आहे. बळीराजा संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब रास्ते यांनी यास मान्यता दिली असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
तासगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांच्या व्यथा मांडण्याबरोबरच जतच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळी जतमधील बळीराजाची व्यथा संमेलनात मांडली. यावेळी देशी बियाणांची जपणूक करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे, संमेलन अध्यक्ष राजकुमार घोगरे, स्वागताध्यक्ष सुभाष आर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तुकाराम बाबा महाराज म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बळीराजा सुखावेल असे वाटत होते पण आजही बळीराजा जगण्यासाठी संघर्ष करत आहे. शेतीतील पिकाला हमीभाव नाही, त्यात दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर असे नैसर्गिक संकटे आले की बळीराजाचे कंबरडे मोडते. अशातही जगाचा अन्नदाता असलेला बळीराजा हे सारे सोसून आपला देश कृषी प्रधान कसा राहील यासाठी झटताना दिसतो. जत तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात आजही शेतीला मुबलक पाणी नाही ही वस्तुस्थिती आहे.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. शेतात पिकले पण लॉक डाऊनमुळे ते विकायचे कुठे हा मुख्य प्रश्न होता. अशा वेळी आपण स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचा शेतीमाल घेतला व जत तालुक्यातील ९० हुन अधिक गावात त्याचे घरोघरी वाटप केले. शेतकरी जगला पाहिजे हीच या मागची भावना होती. येणाऱ्या काळातही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कार्यरत राहणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.