पशूपालकांसाठी “१९६२” टोल फ्री क्रमांक | एका फोनवर उपलब्ध होणार फिरते पशुचिकित्सा पथक

0
2

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमध्ये “मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना” या राज्यस्तरीय योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकामध्ये विविध उपकरणांनी सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पशुपालकांनी “१९६२” या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून त्याच्या पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेची मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे.

फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांसाठी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी “1962” या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करुन त्यास आवश्यक असणाऱ्या सेवेची मागणी नोंदविण्याची आहे. त्यानंतर मागणी केलेल्या सेवेच्या प्रकारानुसार व आजाराच्या तीव्रतेनुसार / वर्गीकरणानुसार संबंधित पशुपालकास 5 तास ते 72 तासांपर्यंत आवश्यक असणारी पशुवैद्यकीय सेवा  फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणार आहे. या पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी शासनामार्फत निश्चित केलेल्या सेवा शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही.

राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थांमार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते. अशावेळी प्रसंगी पशुपालकांना स्वखर्चाने वाहनाची सोय करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधन मयत होऊन, पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी ज्या भागामध्ये दळ्णवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत अथवा पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, अशा तालुक्यांमधील पशुधनास पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करणे आवश्यक होते. त्यानुसार फिरत्या पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे.

जनावरास विताना त्रास होणे, गर्भाशय बाहेर पडणे (अंग बाहेर येणे), गर्भाशयाला पिळ पडणे, सर्पदंश होणे, विषबाधा होणे, तीव्र स्वरुपाची पोटफुगी होणे, घशामध्ये वस्तू अडकणे, पशुधनास अपघात होऊन गंभीर इजा होणे, आग लागून जनावर भाजणे, उष्माघात होणे, घटसर्प अथवा इतर गंभीर आजार होणे या प्रकारच्या गंभीर व अत्यावश्यक सेवांसाठी व इतर आवश्यक असणाऱ्या सेवांसाठी  जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर  व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी “1962” या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. धकाते यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here