अष्टपैलू कलाकार:कमल हसन

0
अष्टपैलू कलाकार:कमल हस
67 वर्षीय कमल हसनची जादू अजूनही कायम असल्याचे ‘विक्रम’च्या शानदार कलेक्शनने सिद्ध केले आहे.  3 जून 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 12 व्या दिवशीही चांगला व्यवसाय केला आहे.  अहवालानुसार, आतापर्यंत चित्रपटाने एकूण 335 कोटींची कमाई केली आहे आणि कमल हसनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
 कमल हसनच्या चित्रपटाने व्यवसायाच्या बाबतीत जगभरात चांगला व्यवसाय केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ‘विक्रम’ने यूकेमध्ये रजनीकांतच्या ‘एंथिरन’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.  याशिवाय या चित्रपटाने 12 व्या दिवशी अमेरिकेतील रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे.  आगामी काळात हा चित्रपट आणखी चांगले कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.विक्रममध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत.  कमल हासनचा ‘विक्रम’ हा एक अॅक्शन ड्रामा आहे.  यात विजय सेतुपती, फहाद हसील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  त्याचबरोबर अभिनेता सुर्याचीही यात छोटीशी भूमिका आहे.  विक्रम हिंदीमध्ये चांगले कलेक्शन करत आहे तसेच चित्रपट तेलगूमध्येही बंपर व्यवसाय केला आहे.
कमल हसन म्हणजे अभिनय,निर्माता,दिग्दर्शक, गीतकार,गायक ,नर्तक अशा चित्रपटाशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये लीलया संचार करणार हरहुन्नरी कलाकार. प्रयोगशील अभिनेता म्हणून त्याची दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ओळख आहे. अलीकडेच त्याने राजकारणातही उडी घेतली आहे. इथे अजून त्याचे सामर्थ्य कळून यायचे आहे. पण उत्तम,बहुश्रुत कलाकार म्हणून चित्रसृष्टी त्याची नक्कीच दखल घेईल.
कमल हसन चार भावंडांपैकी सगळ्यात लहान. त्याचं खरं नाव पार्थसारथी. त्याचे वडील क्रिमिनल लॉयर होते. लहानपणीच त्याचा चित्रपटाशी संबंध आला आणि ते इकडे खेचले गेले. 7 नोव्हेंबर 1954 रोजी कमल हसन याचा जन्म झाला असला तरी त्याच्या चेहऱ्याला रंग लागला तो 1960 मध्येच. म्हणजे अवघ्या सहाव्या वर्षी त्यांना कमेऱ्यापुढं उभं राहावं लागलं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, ‘कालातूर कन्नम्मा’ या चित्रपटातल्या बालकलाकाराची भूमिका त्यांनी अशी काय वठवली की, त्याला एकदम राष्ट्रपती पुरस्कारच देऊन गेला. अर्थात या पुरस्काराचं महत्त्वही फारसं माहीत नसलेला कमल नंतर मात्र आवडीने सातत्याने काम करीत राहिला. 1960 पासून आतापर्यंत तब्बल 60 वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्याने तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांच्या चित्रपटांमध्ये जवळपास दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांचा दर्जा, आशय, आणि देश-परदेशात मिळालेले सन्मान पाहता त्यांचा या चित्रपट सृष्टीतील कार्यकाळ दखल घेण्याजोगा, भारदस्त असा आहे.
कमल हसन फक्त अभिनेताच नाही तर या क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. या क्षेत्रातील एकही प्रांत त्यांनी सोडला नाही. उत्तम कलाकार म्हणून नावलौकिक आहेच,पण चांगला निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप त्याने सोडली. नर्तक, गायक, लेखक म्हणूनही त्याने आपली ओळख निर्माण केली. असे क्वचितच कलाकार चित्रपट सृष्टीला लाभले. कमल हसन यांनी वयाच्या 18 व्या वर्षी चित्रपटाची पहिली स्क्रिप्ट लिहिली. लेखक म्हणून त्यांच्या नावावर सुमारे 25 चित्रपट आहेत. 1975 मधील के.बालचंदर यांच्या ‘अपूर्व रागनगल’ चित्रपटानं त्याला पहिल्यांदा ‘स्टार’ म्हणून यश मिळवून दिलं. या चित्रपटामध्ये त्याने एका वृद्धेच्या प्रेमात पडणाऱ्या बंडखोर तरुणाची भूमिका साकारली होती. ‘मुंद्र पिराई’ चित्रपटात त्याने अभिनयातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.हाच चित्रपट नंतर हिंदीत ‘सदमा’ नावाने प्रदर्शित झाला. पुढच्या काळात त्याला अभिनयाचे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अभिनयात सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक आहे.
1997 मध्ये ‘चाची 420’ या चित्रपटाचे पहिल्यांदा त्याने दिग्दर्शन केले. हा चित्रपट हिट ठरला आणि त्यांच्यातील प्रदीर्घकाळ लपून राहिलेला दिग्दर्शक जागा झाला. नंतर 2000 मध्ये त्याने ‘हे राम ‘ दिग्दर्शित केला. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला तरी या चित्रपटाच्या कलात्मकतेचं कौतुक झालं. 1990 च्या दरम्यान कमल हसन याच्या अभिनयाची गाडी सुसाट होती. पुढे त्याने स्वतःच्या संस्थेमार्फत चित्रपटांची निर्मिती केली. 1970 ते 1987 या कालावधीत सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला होता सुपरस्टार राजेश खन्ना. नंतर चिरंजीव या कलाकाराने सर्वाधिक मानधन घेतले होते. 1992 मध्ये चिरंजीवीने एका चित्रपटासाठी तब्बल सव्वा कोटी मानधन घेतले होते. त्यावेळी हा आकडा ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण पुढे 1994 मध्ये कमल हसनने एका चित्रपटासाठी तब्बल दीड कोटी रुपये मानधन घेऊन कलाकाराला चित्रपटांमध्ये अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले.
हिंदी चित्रपट सृष्टीत त्याने ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून दणदणीत आगमन केले. सुरुवातीलाच चांगले यश मिळाले असले तरी त्याने हिंदीत अधिक चित्रपट केले नाहीत. नंतर त्यांचा ‘सागर’ हा चित्रपटही गाजला. ‘राजतीलक’, ‘सनम ‘तेरी कसम’, ‘गिरफ्तार’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘जरा सी जिंदगी’ या चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी यात त्याचे एकट्याचेही अपयश नाही. ‘सदमा’ ,’अप्पूराजा’ अशा काही दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक त्याने हिंदीत यशस्वी केला. ‘अप्पूराजा’, ‘इंडियन’, ‘मेयरसाब’ साठी घेतलेली त्याची मेहनत लक्षात येते. तमिळ चित्रपट सृष्टीत त्यानं चांगलं काम केलं. ‘विक्रम’, ‘साथी मुथ्थम’ असे कित्येक यशस्वी चित्रपट त्याने आंध्र भाषेतही दिले. चित्रपट सृष्टीत तो यशस्वी ठरला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक वादळं आली. वाणी जयराम सोबत दहा वर्षे संसार केल्यानंतर त्यांचा विवाह मोडला. नंतर त्याने अभिनेत्री सारिकाशी विवाह केला. एका मुलीनंतर 16 वर्षांनी 2004 मध्ये त्यांच्यात काडीमोड झाला. नंतर तो अभिनेत्री गौतमीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. पण इथे त्याला अपयश आले.

 

 

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.