तंत्रज्ञानाचा दुरुपयोग 

0
20
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे मात्र काही महाभाग या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून समाजातील प्रतिष्ठित लोकांची विशेषतः सेलिब्रेटींची बदनामी करत आहे. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईटवर सेलिब्रिटींचे त्यातही हिंदी आणि मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींचे मॉर्फ केलेल्या अश्लील छायाचित्रांचा आणि व्हिडिओचा  पूर आला आहे.  हे छायाचित्र पाहिले की असे वाटते की हे छायाचित्र त्या अभिनेत्रींनीच काढून सोशल मीडियावर टाकले आहेत मात्र नीट पाहिले की लक्षात येते की हे छायाचित्र मोर्फ केलेले आहे. मागील वर्षी  बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असलेली रश्मीका मंधना हीचा डीपफेक व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल करण्यात आला होता.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर  कला क्षेत्रात चांगलीच  खळबळ माजली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर  स्वतः अभिनेत्री रश्मीका हिने हा व्हिडिओ तिचा नसल्याचे सांगून व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून  तिला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही संताप व्यक्त केला होता.  सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका दुसऱ्याच मुलीचा होता. मात्र एडिटिंग करून त्या मुलीच्या चेहरा लपवून त्याजागी अभिनेत्री रश्मीका मंधनाचा चेहरा लावण्यात आला होता. हा व्हिडिओ  व्हायरल झाल्यावर पोलीसातही तक्रार दाखल झाली होती तेंव्हा वाटले होते की या प्रकाराला आळा बसेल मात्र आळा बसणे तर दूरच उलट हा प्रकार वाढतच चालला असून सध्या तर अशा मॉर्फ केलेल्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओजचा महापूर आला आहे. हे  व्हिडिओ एडिटिंग करताना एआय या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
एआयच्या मदतीने व्हिडिओ आणि फोटो एडिट करून लोकांना त्रास दिला जातो. तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती केली आहे. विज्ञानाच्या मदतीने दररोज नवे तंत्रज्ञान उदयास येत आहे. या  तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाचा हेतू मानवी कल्याण हेच आहे मात्र काही नतद्रष्ट लोक या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी नाही तर समाज विघातक कार्यासाठी करतात हा प्रकार त्यातलाच आहे. वास्तविक कोणाचाही  फेक व्हिडिओ किंवा छायाचित्र बनवून  बदनामी करणे हा गुन्हा आहे. अशा समाज विघातक लोकांना कायद्याने कडक शिक्षा व्हायलाच हवी. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग ही नवीच समस्या आता निर्माण झाली आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here