वर्षा सहलीचा आनंद लुटा पण…….           

0
3

 

जून महिन्यात रुसलेला वरुण राजा आता प्रसन्न झाला आहे. राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत असून  मान्सून आता चांगलाच स्थिरावला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा जोर धरत आहे त्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले असून परिसर हिरवाईने नटला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत.  शेतशिवाराने हिरवा शालू नेसल्याने सर्वत्र आनंदाने वातावरण निर्माण झाले आहे. डोंगर दऱ्यातून फेसाळणारे धबधबे अनेकांना आकर्षित करत आहेत. विशेषतः तरुणांना या निसर्ग सौंदर्याचे आकर्षण  जास्त आहे. त्यातही शहरात राहणाऱ्या वर्गाला निसर्गाचे जास्त कौतुक असते कारण त्यांना निसर्गाचा जास्त सहवास लाभत नसतो. अशी मंडळी निसर्गाची नवलाई अनुभवायला पावसाळ्यात आवर्जून घराबाहेर पडतात.

 

वर्षा सहलीचे अयोजन करतात. वर्षा सहलीचा आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. सध्या कुठेही फ़िरायला गेल्यावर सेल्फी घेणे, व्हिडीओ बनवणे  हा ट्रेंड झाला आहे. या ट्रेंडच्या नावाखाली अनेकदा उंच डोंगरावरुन, धबधब्याच्या टोकावरून, चारचाकी गाडीच्या टफावरून किंवा खिडकीतून तोंड बाहेर काढून ,दुचाकीवरुन स्टंट करून  व्हिडिओ बनवले जातात मात्र पावसाच्या दिवसात हे प्रकार जीवावर बेतू शकतात.पावसाळ्यात रस्ते अधिक घसरट झालेले असतात. खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानमुळे खड्डा  किती मोठा आहे याचा  नेमका अंदाज येत नाही. काहीतरी थ्रिलिंग करण्याच्या नादात शरीराला इजा करून घेणे योग्य नाही. नदी, तलाव, धरणे या ठिकाणी  वर्षा सहलीस  गेल्यावर तर अधिक दक्ष राहावे लागते कारण तिथे एखादी छोटी चूकही जीवघेणी ठरू शकते.

 

नदी, तलाव, धरण आणि समुद्रात पोहण्यास गेलेले तरुण बुडून मरण पावल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. खरतर याबाबतीत स्वतः पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजेच पण उत्साहाच्या भरात अनेकांना त्याचे भान राहत नाही म्हणूनच पर्यटन स्थळांच्या व्यवस्थपनाने याबाबत काळजी घेतली पाहिजे. सावधानतेच्या सूचना लेखी स्वरूपात ठळकपणे लिहिल्या पाहिजेत. पाण्याची पातळी किती असल्यास कोणत्या मर्यादेच्या पुढे जाणे धोक्याचे आहे, याबाबत संबंधितांना इशारा दिला पाहिजे. धबधबे पाहण्यास गेलेल्या पर्यटकांना तर तशा सूचना देण्याची सक्त गरज असते. अशा  ठिकाणांना मुसळधार पावसात जाणे चुकच असते त्याप्रमाणे गड, किल्ले, डोंगरमाथ्यावर भटकताना भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते अशा ठिकाणी जोराचा पाऊस आला तर कोणती खबरदारी घ्यावी तसेच अशावेळी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये काय तजवीज केलेली नसते. त्यात काही महाभाग अशा ठिकाणी मद्यपान करून पर्यटनाला जातात.

 

तरुणांनी हे सर्व कटाक्षाने टाळले पाहिजे.  पर्यटकांनी स्वतःची  व स्वतःबरोबर आलेल्यांचीही काळजी घेतली पाहिजे. वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटा, मजा करा पण ही मजा जीवावर बेतणार नाही याचीही दक्षता घ्या.

 

श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here