जतमधील म्हैसाळच्या पाण्यासाठी ऑगस्टमध्ये पाणी परिषद ; तुकाराम बाबांनी पुन्हा रणशिंग फुंकले | दुसरी पायी दिंडी काढणार

0
11
संख,संकेत टाइम्स : जत पूर्व भागातील ६४ गावांना विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी मिळालेच पाहिजे. जतमधील म्हैसाळच्या पाण्यासाठी ऑगस्टमध्ये जत पूर्व भागात जनजागृती मोहिम व पाणी परिषदचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, म्हैसाळ योजना, पायी दिंडी व पुढील वर्षी संख येथे होणाऱ्या राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलना संदर्भात चर्चा, नियोजन व म्हैसाळ लढयाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता संख येथील बाबा आश्रमात शेतकऱ्यांची बैठक चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी बळीराजा पार्टीचे प्रदेश महासचिव बाळासाहेब रास्ते, मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, लखन लोहार, सोहेल पटेल, तानाजी हुळगुळे, ढगे,  दत्ता सावळे आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते म्हैसाळ पाण्यासाठी उभारण्यात येणारा लढा, पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी, वारकऱ्यांचा तातडीने वारी काळात अपघात विमा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणे तसेच संख येथे पुढील वर्षी राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलनाच्या तयारी संदर्भात चर्चा झाली व नियोजन आखण्यात आले.
२०१९ साली ऐतिहासिक संख ते मुंबई मंत्रालय पाण्यासाठी पायी दिंडी काढली. यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जतला पाणी देण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे सांगितले ही वस्तुस्थिती पायी दिंडी नंतरच उघड झाली. तोपर्यत पाणी आहे हाच समज होता. आतापर्यत जी आश्वासने जतकरांना मिळाली ती पाणी उपलब्ध नसताना मिळाली याचा भांडाफोड पायी दिंडीने झाल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, जत पूर्व भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतच्या सहाव्या टप्प्याला तांत्रिक मंजुरी दिली आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी जतसाठी सहा टीएमसी पाणी आरक्षित केले असल्याचे सांगितले आहे. तेव्हा जत पूर्व भागाला तातडीने पाणी द्यावे.
■ पाण्यासाठी लढा तीव्र करणार
जत पूर्व भागातील पाण्यासाठी लढा तीव्र करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जत पूर्व भागातील सर्व गावात ऑगस्टमध्ये जनजागृती मोहीम, त्यानंतर पाणी परिषद घेण्यात येणार आहे. या पाणी परिषदेत पायी दिंडीचे नियोजन आखण्यात येणार आहे. जतच्या पाण्यासाठी राजकारण विरहित लढा आपण उभारणार असून त्यासाठी जतकरांनी पक्ष, संघ, संघटना सारे बाजूला ठेवून पाण्यासाठीच्या या लढयात सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
■ बळीराजा संघटनाही जतकरांसोबत- बाळासाहेब रास्ते
जत तालुक्यात तुकाराम बाबा महाराज यांनी समजकार्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून बळीराजा संघटना कार्य करणार असल्याचे बळीराजा पार्टीचे प्रदेश महासचिव बाळासाहेब रास्ते यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here