भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनणार इंग्लंडचे पंतप्रधान                       

0
4
ज्या गोऱ्या साहेबांनी भारतावर दीडशे वर्ष  राज्य केले त्याच गोऱ्या साहेबांच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये भारतीय वंशाचा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा योग जुळून आला आहे हे विशेष. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराज होऊन त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला. ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यावर एका पाठोपाठ एक अशा अनेक मंत्र्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातुन मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 

मंत्र्यांचा म्हणजेच पर्यायाने जनतेचा विश्वास गमावलेल्या बोरिस जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यानंतर इंग्लंडच्या नव्या पंतप्रधानांचा शोध सुरू झाला अर्थात त्या पदावर सर्वात आधी  ऋषी सुनक यांनी आपला हक्क सांगितला. ऋषी सुनक यांना अनेक मंत्र्यांनी पाठिंबा देखील दिला. नव्या पंतप्रधानांसाठी सत्ताधारी हुजूर पक्षाने मतदान घेतले या मतदानाच्या दुसऱ्या फेरीत ऋषी सुनक यांनी मोठी आघाडी घेतली. गुरुवारी, १४ जुलै रोजी झालेल्या मतदानात अटर्नि जनरल सूयेला ब्रेव्हरमन या बाद झाल्यानंतर पंतप्रधान पदासाठी पाच उमेदवार उरले. दुसऱ्या फेरीअखेर ऋषी सुनक यांना १०१ मते मिळाली असून त्यांच्या खालोखाल पेनी मॉरडंट यांना ८८ मते मिळाली.

 

मतदानाची पुढची फेरी सोमवारी आहे. सर्व फेरीत मिळून सर्वात कमी मतदान मिळालेला उमेदवार बाद ठरतो. आता जे पाच उमेदवार उरले  आहेत त्यांना टीव्ही वरील चर्चेत भाग घेऊन आपणच पंतप्रधानपदासाठी कसे योग्य आहोत हे जनतेला पटवून द्यावे लागते. त्यानंतर पोस्टल मतपत्रिकेची मोजणी होईल आणि मग निकाल घोषित होतील.  हुजूर पक्षातील बहुतांश संदस्यांच्या कल हा ऋषी सुनक यांच्याकडेच आहेच त्यामुळे तेच इंग्लंडचे भावी पंतप्रधान होतील असा होरा तेथील जाणकारांचा आहे. जर तसे झाले तर ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे इंग्लंडमधील पहिले पंतप्रधान ठरतील. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना  मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीला गोऱ्या साहेबांवर राज्य करण्याची संधी मिळेल. भारतीयांसाठी देखील ही अभिमानाची बाब असेल.

 

इंग्लंडमध्ये जन्मलेले ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. ते सुरवातीला ज्युनिअर मंत्री होते २०१८ साली त्यांची इंग्लडचे निवास मंत्री म्हणून निवड झाली. इंग्लडमधील एक कर्तबगार मंत्री म्हणून त्यांची गणना होते.  आपल्या कर्तृत्वाची मोहर  त्यांनी मंत्रीपदावर  उमटवल्यामुळे त्यांची इंग्लडच्या अर्थमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली.  इंग्लंडमध्ये अर्थमंत्रीपद हे पंतप्रधानपदा खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाते. अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द उत्कृष्ट अशीच राहिली. ऋषी सुनक यांचे आई वडील त्यांच्या आजी आजोबांसोबत इंग्लंडला गेले व तेथेच स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचे वडील इंग्लंडमधील प्रसिद्ध डॉक्टर होते तर आई फार्मसीचा व्यवसाय चालवायच्या. त्यांच्या पत्नी या इम्फोसीसच्या नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. १९८० मध्ये हॅम्पशायर येथील साऊथ हमप्टन मध्ये त्यांचा जन्म झाला.

 

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. काही काळ व्यवसाय केल्यावर ते राजकारणात उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले आणि आता लवकरच  इंग्लंडचे पंतप्रधान होतील. ज्या गोऱ्या साहेबांनी आपल्यावर राज्य केले त्याच गोऱ्या साहेबांवर आता ते राज्य करणार आहे याचा भारतीय नागरिकांनाही अभिमान आहे. ऋषी सुनक यांना शुभेच्छा!  श्याम ठाणेदार

 

दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here