जत पोलीस ठाण्यातील दोघेजण ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

0

जत, संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व या अपघातात जप्त असलेली मोटरसायकल सोडण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. गणेश ईश्वरा बागडी व संभाजी मारुती करांडे अशी लाच घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या भावावर जत पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अपघात प्रकरणी संबंधिताची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संबंधिताला मदत करण्यासाठी व जप्त केलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी गणेश ईश्वरा बागडी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली होती.

याबाबत संबंधिताने बागडी यांच्याविरोधात सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दोन दिवस बागडी व कारंडे यांची सापळा लावून चौकशी करण्यात आली. यामध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

Rate Card

त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराला 25 हजार रुपये घेऊन जत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. यावेळी संभाजी कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याचवेळी लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी गणेश बागडी व संभाजी कारंडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, संजय सपकाळ, रवींद्र धुमाळ, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, राधिका माने यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.