बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग एका फोटोशूटने चांगलाच वादात सापडला आहे. अभिनेता रणवीर सिंग याने एका नियतकालिकेच्या मुखपृष्ठासाठी विवस्त्र पोज देऊन फोटोशूट केले. त्याचे हे विवस्त्र फोटो समाज माध्यमात व्हायरल होताच त्याच्यावर चुहुबाजुनी टीका होऊ लागली आहे. सामाजिक भावना दुखावल्या म्हणून काही ठिकाणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे तर दुसरीकडे राम गोपाळ वर्मा सारखे काही बॉलीवूडमधील मंडळी त्याचा समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अर्थात अशा प्रकारे विवस्त्र फोटोसेशन करून खळबळ माजवणारा रणवीर सिंग हा बॉलिवूडचा पहिला कलाकार नाही. याआधी अनेक कलाकारांनी असे फोटोशूट करून खळबळ माजवली होती.
http://पुनम पांडेने पुन्हा एकदा सोशल मिडियाची गर्मी वाढविली | हॉट अंदाज
१९७४ मध्ये प्रोतीमा बेदी या मॉडेलने बीचवर विवस्त्र धावतानाचे फोटो काढले होते. त्यावेळी तिच्यावर खूप टीका झाली होती पुढे पूजा बेदी या तिच्या मुलीनेही तिचाच कित्ता गिरवला होता. १९९५ साली मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांनी गळ्यात बिनविषारी साप घालून नग्न अवस्थेत फोटोसेशन केले होते. मिलिंद सोमण याने दोन वर्षापूर्वीही समुद्र किनारी विवस्त्र धावत फोटोसेशन केले होते. ममता कुलकर्णी या बॉलिवूडच्या अभिनेत्रीनेही एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी असेच फोटोसेशन केले होते.
आता रणवीर सिंगने देखील त्यांचा कित्ता गिरवत भीभत्स फोटोसेशन केले आहे. वास्तविक रणवीर सिंग हा चांगला अभिनेता आहे. अनेक चित्रपटात त्याने दमदार भूमिका केल्या आहेत. त्याचे फॅन फॉलोअर्सवर देखील खूप आहेत मग त्याला ही अशी अवदसा का आठवली असेल? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी बॉलिवूडवाले असे धंदे करत असतील असे मानले तरी हे सभ्यतेला धरून नाही. हे फोटोसेशन जितके धक्कादायक आहे त्याहून त्याचे समर्थन अधिक धक्कादायक आणि संतापजनक आहे. निर्माता दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा याने जर स्त्रिया आपले मादक शरीर दाखवू शकतात तर पुरुष ते का करू शकत नाही ?
असा प्रश्न विचारून रणवीर सिंगचे समर्थन केले आहे. वास्तविक महिलांचे मादक शरीर पडद्यावर कोणी दाखवले ? राम गोपाळ वर्मा सारख्या निर्माते दिग्दर्शकांनीच ना ? जर यांनी महिलांची चांगली प्रतिमा दाखवली असती तर समाजात चांगला संदेश गेला असता पण प्रश्न संस्कार आणि सभ्यतेचा आहे. हेच संस्कार आणि सभ्यता बॉलिवूडमधून हद्दपार होऊ लागली आहे. म्हणूनच अशा गोष्टी घडत आहेत. वास्तविक रणवीर सिंग असो की बॉलिवूडचा कोणताही कलाकार त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आपल्या देशात आहे. तरुण पिढीचे तर ते आयडॉल आहेत.
अनेक तरुण मुले त्यांचे अनुकरण करतात. असे फोटोसेशन करून त्यांच्यापुढे आपण काय आदर्श ठेवत आहोत याचा विचार या कलाकारांनी करावा. कलाकार हा त्यांच्या कलेसाठी ओळखला गेला पाहिजे अशा थिल्लरपणासाठी नव्हे. असा थिल्लरपणा करून प्रसिद्धी मिळणारे कलाकार काळाच्या ओघात नाहीसे होतात. वर उल्लेख केलेल्या कलाकारांचे पुढे काय झाले हे आपण पाहिलेच आहे.
अमिताभ बच्चन, रजनीकांत या सारखे कलाकार आज महान कलाकार म्हणून ओळखले जातात. हे महानपद त्यांना त्यांनी जो अभिनय केला त्यामुळे मिळाले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना अशा थिल्लरपणाची कधीही गरज भासली नाही कारण त्यांचा त्यांच्या कलेवर विश्वास होता.
रणवीर सिंग सारख्या नव्या दमाच्या कलाकारांनी अमिताभ, रजनीकांत यांच्या सारख्या कलाकारांचा आदर्श घेतला पाहिजे. रसिकांच्या मनात स्थान मिळवायचे असेल तर या कलाकारांनी असला थिल्लरपणा सोडून अभिनयावर लक्ष केंद्रित करायला हवे.
श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे.
9922546295