सांगली जिल्हावासियांसाठी मनात कायम विशेष स्थान राहील – डॉ. अभिजीत चौधरी

0

साडेतीन वर्षातील सहकार्याबद्दल महसूल व अन्य प्रशासकीय यंत्रणांचे मानले आभार

– डॉ. अभिजीत चौधरी यांच्या कार्यकाळात हाती घेतलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार
– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

– ‍ कोविड काळात डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतलेले अविरत कष्ट सांगली जिल्हा कधीही
विसरणार नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

 

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागरिक, प्रसार माध्यमे एखादा अधिकारी, कर्मचारी मनापासून चांगले काम करीत असेल तर खूप मोठे पाठबळ देतात. साडेतीन वर्षाच्या कालाखंडानंतर या ठिकाणाहून जात असताना मनात बेचैनी आहेच पण खूप चांगल्या आठवणीही आहेत. सांगली आणि सांगली जिल्हावासियांसाठी मनात कायम विशेष स्थान राहील, असे भावपूर्ण उदगार मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढले. सांगली जिल्हाधिकारी पदी काम करत असताना जवळपास साडेतीन वर्षातील केलेल्या चांगल्या कामगिरीचे यश हे संपूर्ण टीमचे यश आहे. यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा शब्दात डॉ. अभिजीत चौधरी यांनी महसूल व अन्य जिल्हा प्रशासनातील यंत्रणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. राजा दयानिधी रूजू झाले असून त्यांचा स्वागत समारंभ व मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचा निरोप समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनुश्री चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महसूल विभागाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rate Card

 

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविडच्या काळात जेंव्हा लोक वर्क फ्रॉम होम करत होते तेंव्हा आपण फिल्डवर काम करीत होतो याचा आपण सर्वांनीच अभिमान बाळगूया. 2019 चा महापूर, कोविड काळातील ऑक्सिजन कमतरता जाणवणारा काळ यामध्ये खूप काही शिकायला मिळाले. अत्यंत बिकट प्रसंगी शांत राहून निर्णय कशा प्रकारे घ्यावेत हे या काळात शिकता आले. याचा भविष्यात खूप उपयोग होईल. कोरोना, महापूर, निवडणूक याशिवायही जिल्हाधिकारी पदाच्या साडेतीन वर्षाच्या काळात भूसांपादन विषयात आणलेली गतीमानता, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झालेले काम, नगरपालिकांकडील प्रशासकीय कामे या बाबी महत्वपूर्ण आहेत. या काळात जिल्हाधिकारी पदाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी, उंचावण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ज्या माणसाला कोणीही वाली नाही अशा लोकांना मदत करण्यासाठीच प्रशासकीय यंत्रणा आहे याची जाणीव ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली माणुसकी आणि संवेदनशिलता जपत काम करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्हाधिकारी पदी रूजू होत असताना मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपूर्वक केलेल्या स्वागताबद्दल आभार मानून डॉ. चौधरी यांच्या कार्यकाळात हाती घेतलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. डॉ. चौधरी यांनी मनुष्यबळ विकासासाठी दिलेले योगदानही महत्वपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी महसूल यंत्रणेची दिलेली ही टीम ओके टेस्टेड असल्याचे सांगितले. यंत्रणांनी जसे आत्तापर्यंत या आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य केले तसेच यापुढेही आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे कार्य करूया असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनात काम करत असताना मोठ्या भावाची भूमिका निभावल्याचे सांगून कोविडच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांसाठी बेड कमी पडत असताना डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगता अविरत प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना रात्रंदिवस जागून त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन केले. त्यांचे हे योगदान सांगली जिल्हा कधीही विसरू शकणार नाही असे सांगितले. माझी शाळा आदर्श शाळा, स्मार्ट पीएचसी या सारख्या उपक्रमांचे डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुक्ष्म नियोजन केले. अन्य अधिकाऱ्यांना वाव देण्याची त्यांची प्रवृत्ती प्रशासनाचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे मोठेपण अधोरेखीत करणारी आहे अशा शब्दात डॉ. अभिजीत चौधरी यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या व्यक्तीमत्वातील शिस्तबध्द आणि पारदर्शक प्रशासन, नियोजनातील नेमकेपणा, काटकसर यावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, गणेश मरकड, तहसिलदार गणेश शिंदे, किशोर घाटगे, महाराष्ट्र राज्य तलाठी मंडल अधिकारी संघटना जिल्हा सांगली चे अध्यक्ष विजय तोडकर, महसूल कर्मचारी संघटनेचे सहसरचिटणीस कमलेश डाळिंबे, महाराष्ट्र राज्य सचिव चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे महेंद्रकुमार बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी मानले.
०००००

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.