आज ३१ जुलै, चार दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक, सूरसम्राट मोहम्मद रफी यांचा स्मृती दिन. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाब राज्यातील कोटला सुल्तानसिंह या गावात झाला. मोहम्मद रफी यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. मोहम्मद रफी १४ वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब लाहोरला स्थलांतरित झाले. तिथेच त्यांनी शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद बडे गुलाम अली, उस्ताद अब्दुल खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी या महान शास्त्रीय गायकांकडे संगीताचे धडे गिरवले.
पंजाबी चित्रपट गुल बलोच पासून त्यांनी चित्रपट गायनाला सुरवात केली. या चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या आवाजाने प्रभावित होऊन फिरोज निजामी यांनी त्यांना लाहोर रेडिओला नोकरीला लावले. ते रेडिओवर गाणी म्हणू लागली. रेडिओवरील त्यांची गाणी ऐकून जे. बी. वाडिया यांनी त्यांना आपल्या बाजार या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची विनंती केली ती मोहम्मद रफी यांनी मान्य केली. या चित्रपटातील सातही गाणी मोहम्मद रफी यांनीच गायली. ती सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्याकाळातील लोकप्रिय संगीतकार नौशाद यांनी त्यांना अनेक चित्रपटात संधी दिल्या.
पुढे या जोडीने हिंदी चित्रपट सृष्टीवर अधराज्य गाजवले. संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी म्हणजे चित्रपट सुपरहिट असे समीकरणच बनले. मोहमद रफी यांच्या आवाजाने नौशाद यांच्यावर अक्षरशः मोहिनी घातली होती. ५० च्या दशकात नौशाद रफी साहेबांव्यतिरिक्त कोणत्याही गायकासोबत काम करत नव्हते. या दोघांनी लोकप्रिय संगीताचा वापर करून चित्रपट सृष्टीतील गीतांचे आयामच बदलून टाकले. बैजू बावरा, उडण खटोला, कोहिनूर, मेरे मेहबूब, दिल लिया दर्द दिया, संघर्ष या लोकप्रिय झालेल्या चित्रपटांचे संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी ही जोडी प्रसिद्ध होती. ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, मदन मोहन, रोशन या संगीतकरांचेही मोहम्मद रफी हे आवडते गायक होते.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे