सांगली : संपूर्ण देशच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे करीत आहे. प्रत्येक नागरीक, संस्था विविध उपक्रम राबवून मातृभूमीच्या प्रती प्रेमाची, निष्ठेची व अभिमानाची जाज्वल्य भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्य दिव्य तिरंगा राष्ट्रध्वज साकारण्याचा सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम शिराळा नगरपंचायतीने आज राबविला.
शिराळा येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार गणेश शिंदे, नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदिप कुडाळकर तसेच शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमाच्या सुरुवातीला शिराळा शहरातील न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिव छत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दु शाळा , जिल्हा परिषद शाळा, शिराळा तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “ घरोघरी तिरंगा ” अभियानाची जनजागृती करत सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीचा समारोप श्री शिव छत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला. या मैदानावर उपस्थितांना तहसिलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत संबोधित केले. यानंतर या कार्यक्रमाचा प्रमुख गाभा असलेला व कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात साकारण्यात आला.
शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या धैर्य व धाडसाने अभुतपूर्व यशस्वीपणे राबविलेल्या या दैदिप्यमान नेत्रदिपक सोहळ्याचे उपस्थित सर्वांनीच कौतुक केले.