ऑनलाइन रमीवर बंदी आणा

0
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात मोबाईल ही जीवनावश्यक गरज बनली आहे. आजची तरुणाई तर मोबाईलच्या इतक्या आहारी गेली आहे की या तरुणांना मोबाईलचे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे  स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे  गेम असतात या गेमने तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. कॅण्डी क्रश, ब्ल्यू व्हेल, अँग्री बर्ड, पोकोमेन, पब्जी असे ऑनलाइन  गेम इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

 

ऑनलाइन रमी गेम हा देखील त्यापैकीच एक गेम. इंटरनेटवर चालणाऱ्या या  ऑनलाइन रमी गेमच्या विळख्यात  तरुणाई  अडकली आहे. ऑनलाइन रमी गेम खेळण्याचे वेड तरुण पिढीला आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे. मोबाईलवर खेळला जाणारा हा गेम म्हणजे एकप्रकारचा जुगारच आहे. हातात असलेल्या मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळण्याचे अनेक ऍप्लिकेशन उपलब्ध आहेत. घरी, शेतात, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अनेक जण एकत्र येऊन ऑनलाइन रमी खेळताना दिसत आहे. अशाप्रकारे ऑनलाइन जुगार खेळायला लावणाऱ्या ऍप्लिकेशनच्या जाहिराती अनेक दूरचित्रवाणी व सोशल मीडियावर दाखवल्या जातात.

 

या जाहिराती पाहून तरुणाई या गेमकडे आकर्षित होत आहे. या ऑनलाइन जुगारामुळे तरुणांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन रमी गेमच्या नादाला लागून अनेकजण कंगाल झाले आहेत. ऑनलाइन रमी गेममुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. ऑनलाइन रमी गेमच्या विळख्यात अडकल्याने अनेक कुटुंबे बेघर होत आहे. आपल्या पाल्यांना यातून बाहेर काढण्यासाठी काही पालकांनी आपले घर व शेत विकले आहे. सहज पैसे कमवायचे आमिष दाखवून लोकांच्या घामाची कमाई लुटली जात आहे.

 

ऑनलाइन रमी खेळताना पैसे हरल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. यातून काही तरुणांनी आत्महत्या देखील केली आहे. या गेममुळे हिंसाचारही वाढला आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी ऑनलाइन रमी गेमवर बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारने तसा कायदाच केला आहे. केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्येही ऑनलाइन रमीवर बंदी आहे. महाराष्ट्रात मात्र अजूनही या गेमवर बंदी नाही. राज्यातील तरुणांना ऑनलाइन रमी या जुगारातून वाचवायचे असेल तर महाराष्ट्र सरकारने राज्यात ऑनलाइन रमीवर  बंदी आणायला हवी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.