‘झेंडा फडकावूच’ पण जनतेच्या मुलभूत प्रश्नांचे काय ? : अमोल वेटम
सांगली : समाजातील मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्षित करून जात, धर्म, भाषा, स्त्री पुरुष, यांच्या नावाने राजकारण करून समाज मन दुषित केले जात आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्त्री अधिकार, अत्याचार, शेती, पाणी, पर्यायावरण, सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था, पेट्रोल गँस दरवाढ, महागाई, कोट्यावधी प्रलंबित खटले, वाढते बलात्कार, कुपोषण, गरिबी, जातीय अत्याचार याकडे सरकार कानाडोळा करत आहे. आपल्या समाजाची प्रचलित स्थिती सुधारण्यासाठी या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या विचारात घ्यायच्या आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, रस्त्यांची दुरवस्था, राजकीय घोडेबाजार, धोक्यात आलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वाढते खासगीकरण, आदी मुद्द्यांवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात बेरोजगारीने घातलेले थैमान, केंद्र सरकारच्या नोकरीसाठी जवळपास २२ कोटी बेरोजगार उमेदवारांनी गेल्या ७ वर्षात अर्ज केले त्यातील केवळ ७.२२ लाख विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यातून देशातील बेरोजगारीचे भीषण चित्र उभे राहते,ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत,असे मत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात २ लाख १९ हजार पदे रिक्त आहेत. या जागा देखील भरल्या जात नाहीत. लॅटरल एन्ट्री माध्यामतून मागील दारातून भरती सुरु आहे. ‘स्टँड अप इंडिया’ करिता दहा हजार कोटी तरतूद करून अडीच लाख उद्योजक घडविण्याचे पोकळ आश्वासन सरकारने दिले पण प्रत्येक्षात मात्र चार वर्षात या योजनेचे एकही लाभार्थी ठरले नसल्याचे चित्र आहे.
युएनच्या अहवालानुसार ७०० दशलक्ष लोक आहेत ज्यांच्या घरी शौचालये नाहीत. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज ही आव्हाने आहेत. सांगली मिरज कुपवाड मनपा अंतर्गत शाळांमध्ये ना संगणक, ना इन्टरनेट सुविधा आहे. तर सेतू, चावडी तसेच इतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदी कार्यालयातील भ्रष्टाचार कोण रोखणार ? सेतू कार्यालयात ३३.५० रुपये दर असताना देखील विद्यार्थ्यानाकडून यापेक्षा ही जास्त रुपये घेण्यात येते, ५० पैसे चलनात नसतानाही असे दर लावून एकप्रकारे महसूल विभागाकडून भ्रष्टाचार सुरु आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार, देशात दर १००० लोकसंख्येमागे केवळ १.३ रूग्णालये बेड आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक लोकशाही अपेक्षित होती. लोकशाही पुरस्कृत अशी समाजरचना बाबासाहेबांना अपेक्षित आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र, समता व बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्त्वे स्वीकार करणारी पद्धती. पण, सध्या देशात धार्मिक लोकशाहीचे जे काही अवडंबर प्रतिगामी लोकांकडून माजले आहे ते दूर होणे आवश्यक आहे,असेही अमोल वेटम म्हणाले.