आर.आर.आबा….अंजनी ते मंत्रालय ….अनेकांची आयुष्ये ,अनेकांचे संसार बदलणारा प्रवास..!!
कवठेमहांकाळ : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील अंजनी हे आर.आर.आबा पाटील यांचे गाव.या छोट्याशा गावातून आलेल्या आबांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली.”गरिबी माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही,फक्त निसर्गाने दिले आणि कर्तबगारीने घालवले अशी वेळ कधी आपण आणू नये.”असे आबा एकदा भाषणात म्हणाले होते.आपल्या जवळ जे काही आहे त्यांच्या साहाय्याने प्रचंड कष्ट करायचं हे आबांना माहीत होत आणि आबांनी तेच केलं ज्यामुळे अंजनी ते मंत्रालय प्रवास सुकर झाला.
आर.आर.आबा यांची आज जयंती.आबांचा राजकीय प्रवास खूपच खडतर अवस्थेतून झाला.अंजनी येथून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आबा सांगलीला गेले.प्राचार्य पी.बी.पाटील यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन सुरू केलेले.त्यात आबा दाखल झाले.याच काळात त्यांच्यातील वक्ता घडायला सुरुवात झाली.याच काळात आबा महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका या योजनेत काम करत होते.शिक्षणासाठी पैसे उभा करत होते.सामान्य गरीब कुटुंबातील पोराला शिक्षण घ्यायला जो संघर्ष करायला लागतो तो आबांच्या वाट्याला आला.
आबा कायदा पदवीचा अभ्यास करत होते तेव्हाच त्यांना लोकांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे केले.आबा त्यावेळी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून निवडणुकीला उभे राहिले आणि एका मातब्बर उमेदवाराला पराभूत करून विजयी झाले.तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा झाला.त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामाची लोक आज देखील आठवण काढतात,त्या कामांच कौतुक करतात.१९९० साली आबा आमदार झाले.त्यानंतर त्यांनी विधिमंडळात प्रभावी कामगिरी केली.अल्पावधीतच लक्षवेधी आमदार म्हणून आबा परिचित झाले.१९९० ते २०१४ या काळात त्यांनी तासगाव विधानसभा मतदासंघांचे प्रतिनिधित्व केले.

गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबविले.गावातल्या लोकांनी भांडणापासून लांब राहावं आणि जरी भांडणतंटे झाले तरी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ते भांडण गावातच मिटले जावे असा त्यापाठीमागचा उद्देश


आबांनी गृहमंत्री असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली.त्यामुळे गोरगरिबांची अनेक पोर शासकीय सेवेत आली.पर्यायाने अनेक कुटुंबाची गरिबी संपली.पुढच्या पिढीला चांगले दिवस पाहायला मिळाले पण शासकीय सेवेत रुजू झालेल्या गरीब पोरांना आबा सक्त ताकीद देत.. की लग्न करताना हुंडा घ्यायचं नाही,आता आपली गरिबी संपली म्हणजे मुलींच्या घरच्यांना कर्जाच्या खाईत लोटायच नाही..अशा पद्धतीने पोरी-बाळींच्या
बापाचा विचार करणारा राजकारणी विरळच…

आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबार वरील बंदी…डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात..अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात.अनेक तरुणांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारबलावर उधळला.स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले…अशा डान्सबार वर बंदी घालणं आवश्यक होत…डान्सबार वर बंदी घालायचीच असा पण आबांनी केला आणि तो पूर्णही करून दाखवला.
या आणि अशा निर्णयाने अनेक लेकीबाळींचे संसार वाचले..अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचली..अनेकांच्या जमिनी वाचल्या …अनेकांच्या आयुष्याचे नंदनवन झाले…आजही कित्येक माता-माऊली,गोरगरीब लोक,कष्टकरी,शेतकरी लोक आबांना याच कामामुळे आशीर्वाद देतात…आबांबद्दल भरभरून बोलतात…हीच ती आबांची ओळख…हीच ती आबांच्या कार्याची पोचपावती…आणि याच कार्यामुळे आबा नेहमीच फक्त सर्व सामान्य,शेतकरी,कष्टकरी नव्हे तर आजकालच्या राजकारणी लोकांसाठी एक आदर्श,अपराजित,अजातशत्रू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच स्मरणात राहतील….!!!
