माझे नाशिक
महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतीरी वसलेले पवित्र शहर म्हणजे नाशीक. या नावामागे अनेक अख्यायिका व पौराणिक कथा आहेत. ऐतिहासिक ,सामाजिक, पौराणिक , आणि सांस्कृतिक असे महत्त्व असलेल्या नाशिकमधे अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळेही आहेत. सिंहस्थ कुंभामेळा हा जगातील मोठा धार्मिक उत्सव आहे. दर बारा वर्षांनी भरणार्या कुंभमेळ्याचे ठिकाण म्हणून नाशिक जगभर ओळखले जाते. कुंभमेळ्यासाठी भाविक,साधु,संत, महंत मोठ्या संख्येने गोदातिरी स्नानासाठी उपस्थीत राहतात. नाशिक च्या द्राक्षांची अविट गोडी जगभर प्रसिद्ध आहे. बौद्ध आणी जैन धर्मिय लेण्यांसाठी ओळखली जाणारी सुप्रसिद्ध ठिकाणे नाशिक जवळ आहेत. नाशिक पासून साधारण 28 कि.मी. वर गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले त्रंबकेश्वर हे बारा जोतिर्लिंगापैकी एक ठिकाण म्हणून ही प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड व त्यावरील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे साडेतिन शक्तीपीठापैकी एक असून सुंदर पर्यटन स्थळ ही आहे. अनेक ऐतिहासिक मंदिरांचा खजाना नाशिक ला लाभलेला आहे. नाशिक पासून जवळच असलेल्या चांदोरी हे गाव गोदावरीतीरी वसलेले आहे. जेथे नदीच्या पात्रात दगडीव कोरीव बांधकाम अनेक पौराणिक व ऐतिहासिक मंदिरे आहेत. इतिहासाची साक्ष देणारे अनेक वाडे नाशिकचे सौंदर्य वाढवितात.
शांत व सुटसुटीत असलेले नाशिक सेवानिवृत्तांचे शहर म्हणून ही परिचीत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली सुंदर खेडी, व पाडे,हे नाशिकचे वैभव आहे. शैक्षणिक दृष्ट्याही नाशीक अग्रेसर आहे. यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ तसेच महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्य ठिकाण नाशीक आहे. अनेक शूरविरांची भूमी असलेले नाशिक हे साहित्यरत्नांची खाण ही आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन वेळा जन्मठेप हसतमुखाने स्विकारणारे क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशीकचे भूषण आहेत. शहरा पासून जवळच असलेले भगूर ही त्यांची जन्मभूमी असली तरी आपल्या मायभूमी साठी, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे, ‘ने मजशी ने परत मातृभूमिला ‘ म्हणत, आपल्या काव्यातून, साहित्यातून देशभक्तीची गोडी पसरविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतिहासातील सुवर्णपान आहेत. हुतात्मा अनंत कान्हेरे, तात्या टोपे, प्रा.,वसंत कानेटकर, दादासाहेब फाळके, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, वामनदादा कर्डक, पं. विष्णू पलुस्कर यांसारखे अनेक अनमोल रत्न नाशीकचा मान वाढवितात. यांच्या अलौकिक कार्याने नाशीकचे नाव महाराष्ट्रात कानाकोपर्यापर्यत पोहोचण्यास हातभारच लागला.
साहित्य क्षेत्रात नाशिकची मान उंचावून जगभरात मानाचे स्थान मिळवून देणारे मोठे नाव म्हणजे प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर . ज्यांना कुसूमाग्रज या नावाने ओळखले जाते. सहा भावांची एकुलती बहिण कुसूम, तिचे मोठे बंधू असलेल्या शिरवाडकरांनी कुसूमाग्रज या टोपणनावाने विपूल काव्यलेखन केलेले आहे. आपल्या प्रभावी साहित्य लेखनामुळे त्यांना साहित्यातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे. अनेक काव्यसंग्रह, बालवाडःमय,नाटक, एकांकिका,कथा, कादंबरी ,ललीतगद्य अशा अनैक साहित्य प्रकारातील विपूल लेखनाचा साहित्यिक वारसा हा नाशीकच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळेच कुसूमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा “मराठी राजभाषा दिवस” किंवा “मराठी राजभाषा गौरव दिन” म्हणून जगभरात साजरा केला जातो. ही नाशीकसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

निर्मत्सरी, निरहंकारी, निर्मळ मन असणारे, माणूसकी वर विश्वास असणारे कुसूमाग्रज सत्कार समारंभापासून दूर रहाणं पसंत करत. त्यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी त्यांच्या चाहत्यांनी नाशीक शहरात “कुसूमाग्रज प्रतिष्ठानाची” स्थापना केली आहे. त्या माध्यमातून अनेक साहित्यिक उपक्रम राबवत कुसूमाग्रजांचा साहित्यिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातो.सौंदर्याने नटलेला, साहित्यिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक वारसा लाभलेले माझे नाशिक सर्व नाशिककरांच्या हृदयात मानाचे स्थान टिकवून आहे.
– मनिषा चौधरी ,नाशिक
