सांगली : सांगली जिल्ह्यात घरफोड्याचा धुमाकूळ घालणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करुन पंधरा लाखाचे सोन्या चांदीचे दागिने पोलीसांनी हस्तगत केल्याची माहिती अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.
या टोळीने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात घरफोड्या करुन उच्छाद मांडला होता. अतिरिक्त अधिक्षक मनिषा दुबुले व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चौघांच्या टोळीला गजाआड केले.
या टोळीने जिल्ह्याच्या विविध भागात ५० ठिकाणी केलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. ४ आरोपीकडून १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये किमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्हयातील चोरीस गेलेली ९५,०००/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आले. तसेच घरफोडीवेळी वापरलेल्या दोन मोटार सायकलही जप्त केल्या आहेत. एकूण १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जलस्वराज प्रकल्प कारंदवाडी या ठिकाणी छापा मारुन मोबाईल भैरु पवार (वय १९ रा करंजवडे, ता. वाळवा जि. सांगली) , घायल सरपंच्या काळे (वय ४६ रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. तसेच खोत पोल्ट्री फार्म डोंगरवाडी या ठिकाणी छापा मारुन इकबाल भैरु पवार (वय ४०, रा. करंजवडे, ता. वाळवा) आणि प्रविण राज्या शिंदे (वय ३१ रा. गणेशवाडी, वडुज, ता. खटाव जि सातारा) यांना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.