अथणी : स्कूल बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहाहून अधिक विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला. अपघातात स्कूल बस आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. अथणीहून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन बनजवाड येथे निघाली होती. त्यावेळी प्लास्टिक पाईप भरून नेणाऱ्या ट्रकची आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत होत्या. अपघात झाल्यावर विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या. यावेळी बसमध्ये अडकून पडलेल्या एका विद्यार्थिनीला अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी बाहेर काढले. अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग आणि जेवणाचे डबे विखुरले होते. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

