2 लक्ष 95 हजारांची वीजचोरी महावितरणकडून गुन्हा दाखल

सांगली : सांगली जिल्ह्यातील चिंचणी (ता.कडेगाव) येथील एका लघुदाब वाणिज्यिक ग्राहकाची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने पकडली आहे. या ग्राहकांने वीजमीटर बायपास करून 14 हजार 681 वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे 2 लक्ष 95 हजार 330 रूपयांची वीजचोरी केली. सदर प्रकरणी महावितरणने मनोज रामचंद्र मोकाशी यांचेविरूध्द वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
चिंचणी (ता.कडेगाव) येथील हॉटेल प्रतिक परमीट रूम व बिअर बारच्या वीजमीटरची (वीजग्राहक मनोज रामचंद्र मोकाशी) तपासणी दि.08 जुलै 2022 रोजी पंचासमक्ष करण्यात आली. वीजमीटर बायपास करून वीजभार मिटर वरून वा थेट वापरण्याची दुहेरी व्यवस्था या ग्राहकाने केली होती. ही बाब स्थळ तपासणीत उघडकीस आली. वीजचोरीच्या निर्धारित 31 महिने कालावधीत 14 हजार 681 युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू.2 लक्ष 95 हजार 330/- व तडजोडीचे रक्कम रू.20 हजार /- इतके बिल देण्यात आले. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने सदरील बिल भरले नाही.
सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये मनोज रामचंद्र मोकाशी यांचेविरूध्द इस्लामपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक अभियंता नितीन जोशी, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी, निखिल कांबळे यांनी ही कारवाई केली.
