पंढरपूर – प्रेमप्रकरणातून मित्राला संपवले; 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याचा लावला छडा
पंढरपूर येथे प्रेमप्रकरणातून दोघा मित्रांनी लखन गांडूळे या मित्राचा गळा दाबून खून केला. नंतर त्याचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधले आणि पाठीला भलामोडा दगड बांधून विहीरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाच तासातच या प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पो.नि. धनंजय जाधव यांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लखन सुनिल गांडूळे (वय 25 रा. भंडीशेगाव ता.पंढरपूर) हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ शंभू गांडूळे यांनी पोलिसात दिली होती. तर सोमवार 22 ऑगस्ट रोजी लखन गांडूळे याचा मृतदेह वाखरी हद्दीतील एका विहीरीत हातपाय दोरीने तसेच दगड पाठीला बांधलेल्या अवस्थेत सापडला. याची माहिती मिळताच पो.नि. धनंजय जाधव यांनी तत्काळ भेट देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. सदरचा तरुण हा भंडीशेगाव येथील लखन गांडुळे असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत लखनचा भाऊ शंभू याने पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
लखन गांडूळे याच्या दोन मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करताच संशयित आरोपी युवराज सातपुते व तुषार मेटकरी या संशयित आरोपींनी खुनाची कबुली दिली. युवराज सातपुते याचे लखन गांडूळे याच्याबरोबर भांडण झाले होते. दोघांचे भांडण हे प्रेम प्रकरणावरुन झाले होते. मात्र पुन्हा त्यांच्यात भांडण झाल्याने युवराज सातपुते व तुषार या दोघांनी लखनचा गळा दाबून खून केला.

हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांनी लायलॉनची दोरी आणली आणि हातपाय बांधले. तसेच लखनच्या पाठीला दगड बांधला व वाखरी येथील याकुब शेख यांच्या विहीरीत टाकून दिले होते. विहीर मालक याकूब शेख यांनी विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि हा खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. आज न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पो.नि. धनंजय जाधव यांनी दिली.