कोल्हापूर : महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणीव्दारे वीजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, यासाठी वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे महावितरणकडुन करण्यात आलेली आहेत. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी मंडळ नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस परवाना, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी तपासणी अहवाल व बँक खाते पासबुक छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येते आहे.अनाधिकृत वीज वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सव काळात मंडप उभारणी, रोषणाई व देखावे सादर करताना वीजखांब, वीज वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. वीज यंत्रणेपासून सूरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणीचे अर्थिंग करून घ्यावे. वीज भारानूसार योग्य क्षमतेच्या वायर, प्लग, पीन वापराव्यात. ठिकठिकाणी जोड असणाऱ्या वायर वापरणे टाळावे. शक्यतो वीजसंच मांडणी अधिकृत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी. भाविक भक्तांच्या सूरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये. संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. आपात्कालीन स्थितीत महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912 / 18001023435 / 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे महावितरणचे आवाहन आहे.




