अखेर सांगलीच्या हळदीची मक्तेदारी मोडली

0
Rate Card

हळदीच्या निर्मितीपासून ते त्याचा स्वयंपाकातील वापरापर्यंतच्या प्रवासाचा माहितीपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर मागे पाच-महिन्यांपूर्वी सांगलीला येऊन गेले. भारतातील खाद्यपदार्थ आणि मसाले या विषयांवर ते माहितीपट तयार करत आहेत. हळदीसाठी त्यांनी सांगलीची निवड केली. सांगली दौऱ्यात त्यांनी हळदीची शेती,त्यावरील प्रक्रिया, सौदे, हळद पावडर ,हरिपुरातील पेवे यावर अभ्यास आणि चित्रीकरण केले. मात्र त्यांना इथे काही गोष्टी खटकल्या. सांगली हळद फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभर प्रसिध्द आहे. पण तरीही इथे सेंद्रिय हळद  मिळत नाही. सांगलीचा जगात डंका वाजायचा असेल तर सेंद्रिय पिकांना आपलंसं करण्याचे आवाहन संजीव कपूर यांनी सांगलीकरांना केलं आहे. पण आता मुळात सांगली  परिसरात हळद उत्पादनांत घट होत आल्याने हळदीची सांगलीची मोडीत निघाली आहे. हा मान आता हिंगोली जिल्ह्याने मिळवला आहे. हळद बाजार आणि उत्पादन हिंगोळीसह परिसरातील जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता बऱ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुसतेच सांगली शहर पिवळ्या रंगात रंगवून चालणार नाही तर पुन्हा हे वैभव मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि प्रशासनाला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

मराठवाड्यातील जिल्हे आता हळदीसाठी पुढे आले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या मराठवाडय़ाने हळद उत्पादनात मोठी आघाडी घेतली आहे. विशेषकरून हिंगोली, परभणी, वाशिम, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीची आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हिंगोलीत सुरू केली आहेत. सांगलीत यंदा या भागातील हळदीचे सरासरी उत्पादन 15 लाख पोती (एक पोते 50 किलोचे) राहिले. या तुलनेत मराठवाडय़ातील हळदीचे उत्पादन सुमारे 30 ते 32 लाख पोत्यांच्या घरात गेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाजार समितीत हळदीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. हळद खरेदीसाठी आजवर उत्तर भारतातून सांगलीत येणारे व्यापारी आता वसमतमध्ये हळदीची खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे सांगली बाजार समितीतील आठ व्यापाऱ्यांनी वसमत येथे आपली खरेदी-विक्री, अडत्याची दुकाने सुरू केली आहेत.
सांगली परिसरात शेलम आणि राजापुरी हळदीचे उत्पादन घेतले जाते. सांगली भागातील राजापुरी हळद दर्जेदार मानली जाते. मराठवाडय़ात शेलम आणि फुले स्वरूपा या जातीचे उत्पादन घेतले जाते. मराठवाडय़ातील हळदीचा दर्जा मध्यम प्रतिचा असतो. त्यामुळे ही हळद तुलनेने स्वस्त असते. या हळदीचा उपयोग प्रक्रिया उद्योग आणि आखाती देशांत नियातीसाठी केला जातो.

सांगलीची हळद गुणवत्तेच्या बाबतीत सरस आहे. त्यात सातत्य राखता आले नाही. बाजारातील मागणीनुसार त्यात बदलही करण्यात आला नाही. सेंद्रिय हळदीचीही मागणीही आहे. त्याकडेही दुर्लक्ष झाले. उत्पादन कमालीचे घटले आहे. साहजिकच सांगलीचा ब्रँड मागे पडला.
ग्राहक चकचकीत पदार्थांकडे आकर्षित होत असला तरी आता लोकांना त्यात पोषणमूल्यांची कमतरता आहे,याची कल्पना येऊ लागली आहे.लोक सेंद्रिय खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. सांगलीने आपला ब्रँड बाजारात आणला पाहिजे होता. सेंद्रिय पिकांमुळे शेतकऱ्यांना जादा दर मिळून गेला असता आणि सांगलीकरांनी मनावर घेतले तर सांगलीची हळद फक्त देशातच नव्हे तर जगभरात ओळख निर्माण झाली असती.  अजूनही वेळ गेलेली नाही. सांगलीची हळद ही नैसर्गिकदृष्ट्या दर्जेदार आणि गुणात्मक आहे,पण याची माहिती हळद घेणाऱ्या ग्राहकाला नाही. ही माहिती ग्राहकाला करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सांगलीतील व्यावसायिकांनी, शेतकऱ्यांनी आणि सामान्य सांगलीकरांनी आता हातपाय हलवले पाहिजेत. आत्ममग्न आणि आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. कोरोनाच्या काळात लोक प्रोटिन्सयुक्त खाण्याकडे वळले आहेत. हळद ही सर्वात चांगली प्रोटीन्सयुक्त घटक आहे.चवीसाठी हळद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र तरीही हळद मसाल्याच्या पदार्थांपेक्षा मागे आहे. सांगलीच्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ते औषधी कंपन्यांना माहिती करून देण्याची गरज आहे. औषधी कंपन्या हळदीसाठी मोठी बाजारपेठ असू शकते.

सांगलीच्या हळदीच्या व्यापाराला जवळपास दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे.1910 च्या सुमारास येथे हळद वायदे बाजार सुरू झाल्याची नोंद आढळते. हळदीच्या व्यापाराबरोबर हळदपूड व पॉलिशचे कारखानेही उभे राहिले.हळूहळू इथल्या बाजारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह शेजारील कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथून हळद विक्रीसाठी येऊ लागली.हळदीचे सौदे प्रामाणिकपणे काढले जात असल्याने त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आजही सांगलीत शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पेढ्या आहेत. हळदीच्या दरातील पारदर्शकतेमुळे देशभरात इतर ठिकाणी सौदे होण्यापूर्वी सांगलीतला दर विचारला जातो. केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापार सांगली म्हणजे हळद अर्थात ‘टर्मरीक सिटी’ अशी ओळख निर्माण होणे गरजेचे आहे. हळद साठवणारी हरिपुरातील नैसर्गिक पेवे म्हणजे आश्चर्यच आहे. दुर्दैवाने 2005 च्या महापुरानंतर या पेवांची मोठी पडझड झाली.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांत इथल्या बाजारपेठेतील आवक वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत होते. बाजारपेठेतील हळदीची वार्षिक आवक 12 ते 15 लाख क्विंटल इतकी आहे. राजापुरी व परपेठ हळदीची उलाढाल जवळपास हजार कोटींपर्यंत आहे. हळदीमुळे इथे अनेकांना रोजगार मिळाला आहे. हळदीला दोन वर्षांपूर्वी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हळदीला एकप्रकारे ‘क्वॅलिटी टॅग’ लागला. संपूर्ण जिल्ह्यासाठी हळदीला मानांकन मिळवणारा सांगली हा देशातील एकमेव जिल्हा म्हणावा लागेल. हळदीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधोरेखित झाली आहे, पण अजून यासाठी बरेच काम करावे लागणार आहे. शेफ संजीव कपूर भारतभर सर्वत्र फिरतात. अभ्यास करतात. साहजिकच त्यांना सांगलीच्या हळदीचे महत्त्व माहीत आहे, मात्र अजूनही हळद तिच्या महत्वाच्या तुलनेत मागे असल्याचे दिसून येते. आता हळद वायदे बाजार संपुष्टात येतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्याने सांगलीची मक्तेदारी मोडून काढली आहे. हळद उत्पादन क्षेत्र वाढल्याने व्यापाऱयांसह सर्वांचाच ओढा मराठवाड्याकडे वाढला आहे. सांगलीची हळदीची ओळख टिकवून आणि वृद्धिंगत होण्यासाठी, इथले शेतकरी, लोकप्रतिनिधी  काही करतील का?

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.