वर्दीतील माणूस : पोलीस निरीक्षक संजीव झाडे

0

तसं पाहिलं तर पोलीस खात्यातील अधिकाऱ्याचा ताल काही औरच असतो. आपण जणू काही आभाळातून पडलो आहोत, अशा अविर्भावात अधिकारी वावरत असतात. असे अधिकारी कधीच जनतेशी जवळीकता साधू शकत नाहीत. मात्र, काही अधिकारी त्याला अपवाद असतात. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहनाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसे असे काम ते करीत आहेत. त्यांच्या रुपात वर्दीतला माणूस पहायला मिळत आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने हा शब्दप्रपंच….!

खरं तर तासगाव तालुका हा राजकीय, सामाजिक आणि एकूणच सर्व क्षेत्रातील संघर्षामुळे संवेदनशील आहे. यापूर्वी या तालुक्यात अनेक अधिकाऱ्यांना नाहक त्रास झाला आहे. त्यामुळे बरेचसे अधिकारी तासगावात नोकरी करायला धजावत नाहीत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मात्र कोणताही मागचा – पुढचा विचार न करता तासगावचा पदभार स्वीकारला.

 

मात्र तासगावात रुजू होताच एकापाठोपाठ एक असे सहा मुडदे पडले. परिणामी तालुका हादरला. साहजिकच झाडे साहेबांवर मानसिक, सामाजिक दडपण आले. मात्र साहेबांनी खचून न जाता एलसीबी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. तेव्हापासूनच त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख झाली.

खुनातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असतानाच साहेबांनी इतर गुंड – पुंडांनाही जरब बसवली. खासगी सावकारांना तर कोपरापासून – ढोपरापर्यंत सोलून काढत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी अनेक कारवाया केल्या. बऱ्याचवेळा त्यांच्यावर काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, साहेबांनी हा दबाव झुगारून टाकला. मला राजकीय दबावाचा फरक पडत नाही, असे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले.

कोरोनाच्या काळात तर साहेबांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन झोकून देऊन काम केले. या कठीण काळात ते नेहमी कर्मचाऱ्यांना स्वतःची, कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करीत होते. पोलीस कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील सदस्यच आहेत, या भावनेतून साहेब नेहमी सहकार्याची भूमिका घेत असतात. बऱ्याचवेळी वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नसल्याचे दिसून येते. संजीव झाडे यांच्या बाबतीत अनुभव मात्र वेगळा आहे.

 

खरं तर समाजात, जनतेच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे. मात्र बऱ्याचवेळी अनावश्यक पोलिसिंगमुळे जनता आणि पोलिसांमधील दरी वाढत जाते. संघर्षाच्याही घटना घडतात. झाडे साहेबांनी मात्र सुरुवातीपासूनच जनता आणि पोलिसांमध्ये दरी पडू नये, याची काळजी घेतली. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पद्धतीने कोणावर कारवाई होणार नाही, याचीही काळजी घेतली. राजकीय गटबाजीत समन्वय साधत कोणालाही न दुखवता आपले काम केले.

Rate Card

त्यांच्यासारखे चांगले अधिकारी तासगावला मिळणे, हे भाग्यच म्हणावे लागेल. साहेब तासगावला रुजू झाल्यापासून तासगाव कारखान्याच्या ऊस बिलाचा विषय पेटला आहे. या प्रश्नावरून अनेक आंदोलने, मोर्चे निघाले. बऱ्याचवेळा परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असे वाटत होते. मात्र पोलीस निरीक्षक संजीव झाडे व तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली. वेळोवेळी आंदोलनात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कारखान्याने शेतकऱ्यांना धनादेश देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांसोबत झाडे साहेब रात्री दोन – दोन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात बसून असायचे. पोटात अन्नाचा कणही नसताना केवळ शेतकऱ्यांसाठी झाडे साहेबांसह तहसीलदार साहेबही हा प्रश्न हाताळताना दिसत होते. खासदार संजय पाटील यांच्या ऊस बिलाच्या भानगडी निस्तारताना बऱ्याचवेळा या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ यायचे. मात्र हे आपले कामच आहे, या भावनेतून दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

 

आपले कर्तव्य पार पाडत असतानाच झाडे साहेबांनी पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध तयार व्हावेत, यासाठी परिश्रम घेतले. त्यासाठी स्वतः अधिकारी असल्याच्या थाटात ते कधीच वावरले नाहीत. उलट पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या कामाचा निपटारा करण्यात ते समाधान मानत होते. खरं तर ज्या पोलीस अधिकाऱ्याला जनतेचे प्रेम मिळवता येते तोच अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत बनतो. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे संजीव झाडे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. सत्कार केला. त्यांनी गेल्या वर्ष – सव्वा वर्षात जनतेशी निर्माण केलेल्या संबंधाची ही पोहोचपवती आहे. बऱ्याचवेळा पोलीस अधिकाऱ्यांच्या हिडीस – पीडिस स्वभावामुळे जनता आणि त्यांच्यात सलोखा निर्माण होत नाही. झाडे साहेबांनी मात्र कठोरपणे काम करीत असतानाही जनतेशी चांगले संबंध जपता येतात, हेच दाखवून दिले आहे.

साहेब जेवढे वरून शांत, संयमी दिसतात तितकेच आणून कडकही आहेत. मागील काही वर्षांपासून पोलीस ठाण्यातील पठ्ठ्याचा आवाज बंद झाला होता. मात्र साहेब रुजू झाल्यानंतर या पठ्ठ्यानेही कात टाकली आहे. ‘लाथो के भूत बातो से नही मानते’, या म्हणीप्रमाणे साहेबांनी हुल्लडबाज, टवाळखोरांना पठ्ठ्याचा प्रसाद दिला आहे. त्यांच्या पठ्ठ्याचा आवाजाची शहरभर चर्चा आहे. खरं तर गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पठ्ठा चाललाच पाहिजे. त्यामुळे साहेबांनी पठ्ठ्याचे अस्त्र बाहेर काढल्याने तासगावकरांमधून स्वागत होत आहे.

साहेबांबद्दल लिहावं तितकं थोडं आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने हा शब्दप्रपंच. साहेबांना दीर्घायुष्य लाभो. शतायुषी व्हा, हीच तासगावच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस, पदोन्नतीसाठी सदीच्छा. शेवटी वाढदिवसानिमित्त कोटी – कोटी शुभेच्छा..

– अमोल पाटील
संपादक, साप्ताहिक ‘जनतांडव’, जनतांडव न्यूज
मोबा : 9405 55 66 77

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.