‘अंनिस’ च्या वतीने दुर्बिणीतून चंद्रग्रहण पाहण्याची सोय! रेडमून चे सुरेख दर्शन
सांगली : आज (ता 8)चंद्रग्रहणा निमित्ताने गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग येथे नागरिकांसाठी चंद्रग्रहण दुर्बिणीतून पाहण्याची सोय सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केली गेली होती.
सायंकाळी ६ वाजलेपासून चंद्राची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळी ६.१२ ला उगवता चंद्र सांगलीकरांना दिसला तो ग्रहणातच. ग्रहणामुळे तो तांबूस दिसत होता. आपल्या कडे ३० टक्केच खंडग्रास ग्रहण दिसणार असल्याने उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण स्पष्ट दिसत नव्हते. मात्र १० इंची न्यूटोनियन दुर्बिणीतून चंद्रग्रहणाचा विलोभनीय नजारा छान दिसत होता. चंद्राच्या एका बाजूला पृथ्वी ची सावली पडलेला भाग काळा दिसत होता.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चंद्रग्रहणाची शास्त्रीय माहिती खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे आणि प्रा. अमित ठाकर हे उपस्थितींना देत होते. तसेच ग्रहणाविषयीच्या अंधश्रद्धा , गैरसमजुती याबाबत अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात हे उपस्थितींचे प्रबोधन करत होते.
ग्रहणकाळात अंनिस कार्यकर्त्यांनी चहा नाष्टा खात ग्रहणात काही खायचे नसते ही अंधश्रद्धा मोडीत काढली. या नाष्ट्याची सोय सांगली शहर अंनिसच्या अध्यक्षा सौ. गीता ठाकर यांनी केली होती.यावेळी अंनिस कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, प्रा. अमित ठाकर, गीता ठाकर, आशा धनाले, धनश्री साळुंखे, त्रिशला शहा, विशाखा थोरात हे उपस्थित होते.
न्यूटनियन दुर्बिणीतून खंडग्रास चंद्रग्रहण पाहताना नागरिक