मिरज : शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रथमेश सुरेश ढेरे टोळीस पोलिस अधिक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.अधिक माहिती अशी,मिरज शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे (वय २१) विशाल बाजीराव शिरोळे,(वय २०),सुरज चंदु कोरे,(वय २२,सर्वजण रा.मिरज) या टोळीविरुद्ध सन २०२० ते २२ मध्ये मिरज पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये खुन करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे, घातक हत्यारानिशी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी सांगली यांनी जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी मारामारी करणे, तडीपार मुदतीत हद्दपार प्राधिकरणाच्या पुर्व परवानगीशिवाय हद्दीत प्रवेश करणे असे गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल आहेत.
नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी अशोक विरकर,मिरज यांचा चौकशी अहवाल,
टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे,सुरज कोरे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपार केला आहे.