राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनवावेत | – तुकाराम बाबा
जत : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवरक बोम्मई यांच्या जतच्या दाव्यानंतर राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने एकी दाखवत कर्नाटक सरकारला खडे बोल सुनावले आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनवावेत. दुष्काळी जतला पाणी मिळवायचे असेल तर राज्यकर्त्यांनी जतच्या पाण्यासाठी एकसंघ लढा उभारणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांनी लढा उभारावा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी केले.
तुकाराम बाबा म्हणाले, १९८४ साली म्हैसाळचा उगम झाला. दुष्काळी जतला या योजनेतून पाणी मिळेल, जतचा दुष्काळ हटेल अशी अपेक्षा होती. युती शासनाच्या काळात जतला सहाव्या टप्प्यातून पाणी देण्याचे नियोजन आखले खरे पण प्रत्यक्षात जतच्या शिवारात २०१२ साली भयावह दुष्काळ पडल्यानंतर म्हैसाळचे पाणी दाखल झाले. आज २०२२ साल उजाडले तरी जतच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी गेलेले नाही. २०१९ ला जत पूर्व भागातील ६४ गावांना पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेला तत्वतः मान्यता दिली पण अद्याप त्याला मंजुरी झाली. पाणी उपलब्ध नसताना योजनेला तत्वतः मान्यता मिळाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतवर दावा सांगितल्यानंतर पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी केलेला जतचा दाव्यानंतर राज्यकर्त्यांनी जतमधील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे. २०१२ साली भयावह दुष्काळ पडल्यानंतर लोकभावनेतून त्यांनी विषय मांडत पाणी देण्याची मागणी केली पण अद्याप जतला पाणी आले नाही.
जतला पाणी द्या या मागणीसाठी वर्षानुवर्षे जतकर रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. मोर्चे, उपोषणे, पाणी परिषदा, भीक मागो आंदोलन, उमदी ते सांगली पायी चालत जात जतकरांनी पाण्याची मागणी केली. आपण स्वतः दोन वेळा पाणी परिषदा घेतल्या, २०१९ मध्ये संख ते मुंबई पाण्यासाठी पायी दिंडी काढत मंत्रालय गाठले. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी जत पूर्व भागातील ६४ गावांना द्यायला पाणीच नसल्याचे सांगितले. तेव्हा सर्वांना समजले की जत पूर्व भागाला पाणी देण्यास पाणीच शिल्लक नसल्याचे उघड झाल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले की, जत पूर्व भागातील विस्तारित म्हैसाळ योजनेला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या काळात सहा टीएमसी पाणी मंजूर करून दिले आहे. एकूणच हा पाण्याचा लढा आजही सुरू आहे. जतला पाणी मिळवायचे असेल तर एकसंघ लढा उभारणे काळाची गरज आहे.