जत,संकेत टाइम्स : सत्ता बदलानंतर जत तालुक्यातील १४३ कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कामावरील स्थगिती उठवल्याने मंजूर विकासकामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ. विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
आ. सावंत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संभूराज देसाई यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव नंदकुमार उपस्थित होते. आ. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देत जतकरांची व्यथा सांगितली. १४३ कोटींची विकासकामे मंजूर झाले आहे पण स्थगिती असल्याने ही कामे अडली असल्याचे आ.सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगताच मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामावरील स्थगिती उठविण्याचे आदेश दिले. विस्तारित म्हैसाळ योजना कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला तांत्रिक मंजुरी व निधीबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आ. सावंत यांना सांगितले. तालुक्यातील जत, सनमडी, मायथळ,मुचंडी व मोरबगी येथे नवीन उद्योग सुरू करण्याबाबतही मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याची माहिती आ. सावंत यांनी दिली.
दुष्काळी, सीमाभागातील आवर्षण ग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवा
आमच्या भागातील 20 एकराचा शेतकरी ऊसतोडीला जातो ही वस्तुस्थिती आहे. पाच एकराची अल्पभूधारक अटीचा फायदा शेतकऱ्यांना होतच नाही. केंद्र व राज्य सरकारने ज्या पद्धतीने अल्पभूधारकची योजना राबवते त्याच धर्तीवर दुष्काळी व सीमाभागातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवावी. दहा एकर शेती असलेल्यांना याचा लाभ व्हावा. याबाबत आवर्जून विचार करावा अशी मागणी आ. सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव नंदकुमार यांना बोलावून घेत दुष्काळी, सीमाभाग, अवर्षण भागातील शेतकऱ्यासाठी विशेष योजना राबविता येते का याचा अभ्यास करून तात्काळ अहवाल सादर करावा असा आदेश दिला. ही विशेष योजना राज्यात लागू झाल्यास त्याचा फायदा दुष्काळी व सीमाभागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे आ. सावंत यांनी सांगितले.
मुंबई येथील बैठकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आ.सांवत,मंत्री उदय सामंत