जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहेत. कॉग्रेस,शिवसेना उध्दव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा, शिवसेना शिंदे गट अशी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असणारे गावपॅनल राजकारणाच्या गर्तेत ‘बॅकफुट’वर राहिले आहे.
राज्यातील राजकारणाचे बदलते समीकरण पाहता ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित आहेत. निवडणुकीत मात्र वाडीवाडीवर बैठका होऊन समोरासमोरील थेट दुरंगी लढत होत आहे. गावच्या विकासाकरिता पक्षविरही राजकारण करू या? विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.
गावागावांमध्ये गटातटाचे राजकारण शिरलेले दिसत आहे. जनतेमधून थेट सरपंच निवडीमुळे पक्षाचा झेंडा महत्त्वाचा बनला आहे. ग्रामीण भागात ‘गावचा विकास तर पक्षाचा झेंडा हमखास’ असाच प्रचार हाेत आहे. बदलत्या राजकारणात गावपॅनलही गावाबाहेरच राहिले आहे.