तासगाव : गुहागर विजापूर रस्त्यावरील जरंडी पत्रा येथे बांधकामाच्या ठिकाणी झोपलेल्या युवकाला हत्याराचा धाक दाखवून,त्याला मारहाण करून लुटणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली. सावळज येथे तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.प्रतिक ऊर्फ दगडु दादासो चव्हाण (वय २० रा. सावळज)असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भास्कर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री जरंडी पत्रा येथे हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शिंदे यांचा मुलगा झोपला होता.
रात्री दोनच्या सुमारास संशयित तेथे गेला. त्याने प्रवीणला झोपेतून उठवून धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील पाकीट व त्यामधील २३०० रोख रक्कम व मोबाईल काढून घेतला. प्रवीण याने विरोध केला असता संशयिताने प्रविण यास धारदार हत्याराने डोकीत मारहान करुन, चेहऱ्यावर कशानेतरी मारहान करून जखमी केले.यातील संशयितांचा शोध सावळजमध्ये घेत असताना सपोनि केराम व पोलीस शिपाई दत्तात्रय जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित सावळज दुरक्षेत्र परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने संशयिताला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक मोबाईल,रोकड जप्त करण्यात आली.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बजरंग झेंडे, नितीन केराम, अमित परीट,अभिजित गायकवाड, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.