सांगली : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्यामुळे विविध प्रकारातील वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे ही सर्व सामान्य माणसाला तर परवडणारीच नाही असा आरोप सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले, घरगुती वीज ग्राहकांना १६ टक्के, वाणिज्य ग्राहकांना २१ टक्के आणि औद्योगिक ग्राहकांना ७.५ टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे, प्रत्यक्षात ही दरवाढ त्याहीपेक्षा जास्त होणार आहे. या वीज दरवाढीचा मोठा फटका सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांना बसणार आहे.
ते म्हणाले, यापूर्वी किरकोळ वीज दरवाढ झाली तरी, श्री. फडणवीस यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता आणि आता ते स्वतःच एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवत आहेत. आधीच महागाईमुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे, आणि तशातच अशा पद्धतीची वीज दरवाढ झाली, तर सर्वसामान्य माणसांचे बजेट पुरते कोलमडणार आहे.
वीज ग्राहकांनीन या दरवाढी विरोधात तीव्र आवाज उठवण्याची गरज आहे, प्रस्तावित दरवाढीच्या विरोधात ग्राहकांनी आपल्या हरकती, तक्रारी वीज नियामक मंडळाकडे फॉर्मद्वारे करावयाची आहे. जास्तीत जास्त तक्रारी देऊन ही दरवाढ हाणून पाडली पाहिजे, असेही श्री. पाटील म्हणाले