जत,संकेत टाइम्स : शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ फुटी अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पणाचा मुहूर्त ठरला असून येत्या १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह विद्यमान खासदार, आजी-माजी आमदार यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे किंवा अन्य कोणी मंत्र्यांनी जर येण्याची तारीख दिली तर ती तारीख निश्चित करू अन्यथा १७ फेब्रुवारीला लोकार्पण होणार हे निश्चित असल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बोलावले होते पण त्यांचा कार्यक्रम ‘व्यस्त’ असल्याने वेळ मिळाली नसल्याचे विलासराव जगताप यांनी सांगत यावेळी अप्रत्यक्ष नेत्यांवर नाराजी व्यक्त केली
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळयासंदर्भात निर्णय घेण्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जत पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, रणजित कदम, उद्धव ठाकरे शिवसेनेचे विजयराजे चव्हाण, जत नगर परिषदेचे माजी सभापती प्रकाश माने, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, संतोष मोटे, मिलिंद पाटील, भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने, माजी नगरसेवक गौतम ऐवाळे, सद्दाम अत्तार, अजिंक्य सावंत, रुपेश पिसाळ, मकसूद नगारजी, शशी नागणे, दिनेश जाधव,प्रमोद चव्हाण, प्रकाश मोटे, सुमित जाधव,राहुल मोरे,राघवेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर सर्वांनी लोकार्पण सोहळासंदर्भात जागेची पाहणी केली. यावेळी जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते. विलासराव जगताप यांनी मुख्याधिकारी यांना लोकार्पण तयारी बाबत सूचना दिल्या.