पर्यावरणाचा जागर अन् व्यवसाय, उद्योगाला स्टार्ट अप् ,सुमंगल लोकोत्सव

0
Rate Card

कोल्हापूर : पर्यावरण जागृतीचा जागर, सेंद्रिय शेतीचा प्रचार, पंचमहाभुतांच्या महतीचे सादरीकरण, स्वास्थ, शिक्षण आणि कृषी यांच्या आधुनिकीकरणासाठी दिली जाणारी माहिती याबरोबरच छोट्या-मोठ्या उद्योजक, व्यावसायिकांना आपला व्यवसाय व उद्योग वाढीसाठी मोठे व्यासपीठ ‘सुमंगलम लोकोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी तब्बल हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. शिवाय दहा हजारांवर व्यावसायिकांचे संमेलन होणार असून त्यांच्या अनुभवाची शिदोरीच नवउद्योजकांना मिळणार आहे.

पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ होत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयारीची पाहणी केली. अतिशय चांगली तयारी सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. यामुळे नियोजनाला आणखी गती आली आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांची गॅलरी उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सहाशे मूर्तींचा वापर करत सोळा संस्कार दाखविण्यात आले आहेत. तेही काम पूर्ण झाले आहे.
पारंपारिक ग्रामीण समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आधुनिक कार्यपद्धतीची माहिती या लोकोत्सवातून देण्यात येणार आहे. पर्यावरण जागृतीबरोबरच युवकांसह सर्वांनाच उद्योग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक स्टार्टअप प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहेत. यासाठी दहा हजारावर व्यावसायिकांचे संमेलन होणार आहे. देशभरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्योग, व्यवसाय कसा वाढवावा याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
सामान्य शेतकरी, व्यावसायिकपासून ते प्रथितयश उद्योजकांनाही त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेती औजारे व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी तब्बल हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे छोटी छोटी औजारे येथे उपलब्ध असतील.  बियाणांचे स्टॉलही उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू याशिवाय पर्यावरणपूरक वस्तूही येथेही मिळतील.
शेतकरी आणि उदयोजकांना राज्य सरकारच्या योजनांची, अनुदानाची माहिती मिळावी म्हणून पन्नास पेक्षा अधिक स्टॉल आहेत. आद्योगिक प्रकल्पांची माहिती देण्यासाठी ‘एमआयडीसी हब’ उभारण्यात आले आहे. युवकांना उद्योग क्षेत्रातील नवनव्या संशोधनाची माहिती मिळावी म्हणून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत.
रोज चार ते पाच लाख लोक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे उत्पादनांना मोठा ग्राहकवर्ग मिळणार आहे. बचत गटाच्या महिलांनाही त्यांच्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीची सोय करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या वस्तूंना मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध होणार आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून ते उद्योजक, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.

राजू लिंग्रज
सदस्य, संयोजन समिती

शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ लोकोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठी पर्वणी मिळणार आहे. जनजागृतीबरोबरच व्यवसायवृध्दीसाठी उपलब्ध करून दिलेली ही संधी आहे.

प्रताप कोंडेकर, सदस्य, संयोजन समिती
……………..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.