जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अनेक खाजगी दवाखान्यात अप्रशिक्षित कर्मचारी रुग्णाच्या जिवाशी खेळत आहेत.त्यामुळे रुग्णांना फटका बसत असून संबंधित विभागाने अशा दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी करून कारवाई करावी,अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
साबळे पुढे म्हणाले,जत तालुक्यातील गरीब,कष्ठाळू जनतेचा काही खाजगी दवाखाने, विना परवाना लँब चालक, बोगस डॉक्टर गैरफायदा घेत असून अनेक अप्रशिक्षित कर्मचारी महत्वाच्या तपासण्या,टाके घालण्यासारखे कामे अनेक खाजगी दवाखान्यात करत असल्याचा आरोपही साबळे यांनी केला आहे. त्याशिवाय परवानगी नसतानाही काही दवाखान्यात लँब चालविली जात आहे.येथेही प्रशिक्षित कर्मचारी नसतात.जादा बिले आकारून नागरिकांची पिळवणूक केली जात आहे.
यापुर्वी आम्ही अशा प्रकाराबाबत आरपीआयच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडे निवेदने देऊन ही परिस्थिती बदलण्याची मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असून असे प्रकार सातत्याने वाढत आहेत.आरोग्य विभागाने विशेष पथक नेमून अशा प्रकाराची प्रत्येक दवाखान्यात तपासणी करावी, अशी मागणीही साबळे यांनी केली आहे.