जत,संकेत टाइम्स : राजे रामराव महाविद्यालय, जत येथील पदार्थविज्ञान विभागाचे डॉ. राजाराम सुतार यांची हेनान विद्यापीठ, चीन येथे पोस्ट-डॉक्टरल संशोधनासाठी निवड झाल्याबद्दल आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. येत्या २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते हेनान विद्यापीठ, चीन येथे रुजू होतील. हेनान विद्यापीठातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शानहु लिऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढील संशोधन पार पाडणार आहेत. डॉ. राजाराम सुतार हे मूलतः जत तालुक्यातील पाच्छापूर गावचे आहेत.
राजे रामराव महाविद्यालय, जत सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करीत त्यांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. २०१७ साली टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, जपान येथे ०३ आठवडे संशोधन केले आहे. त्यांचे एकूण २२ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले असून ११०० हुन जास्त गुगल सायटेशन मिळाले आहेत. जत मध्ये सलग ०६ आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडले, अनेक एम. एस्सी. च्या विद्यार्थ्याच्या संशोधन प्रकल्पात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
डॉ. सुतार हे हेनान विद्यापीठामध्ये रुजू झाल्यानंतर फोटोथर्मल सुपिरहायड्रोफोबिक कोटिंग विकसित करणे यावर संशोधन करणार आहेत. या संशोधनामुळे पृष्ठभागाची आपोआप सफाई आणि सूर्यप्रकाशामध्ये पृष्ठभागाचे आपोआप निर्जंतुकीकरण होणे अतिशय सोपे होणार आहे. सत्काराच्या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग साहेब, राजे रामराव महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. अप्पासाहेब भोसले आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरचे प्राध्यापक डॉ. संजय लठ्ठे आदी उपस्थित होते. डॉ. सुतार यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.