सांगली : आटपाडी डाळिंबाचा ब्रँड तयार करुन जीआय मानांकन मिळण्यासठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
मॅग्नेट प्रकल्पांततर्गत डाळिंब पिकातील उत्तम कृषि पद्धती याबाबत फार्म डीएसएस यांच्या माध्यमातुन डाळिंब प्रशिक्षण कार्यक्रम आटपाडी येथील जवळे मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, मॅग्नेट प्रकल्प विभागीय उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले, कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी प्रशासक बिपीन मोहिते, कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव शशिकांत जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री. पाटील,पंकज मोटे, गुलाबराव पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी डाळिंब उत्पादकांना येत असलेल्या अडचणी ऐकून घेवून यापुढेही डाळिंब उत्पादकांसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा वर्षातून चार वेळा कृषि पणन मंडळ मार्फत आयोजित करण्याबाबत सुचित केले. तसेच डाळिंब उत्पादकांच्या अडचणींबाबत जिल्हास्तरावरील अडचणी ताबडतोब सोडविण्यात येतील व शासन स्तरावरील अडचणीं सोडविण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांना डाळिंब पिक उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणी शासनापर्यंत पोहचवण्याबाबत ग्वाही दिली. मॅग्नेट प्रकल्प विभागीय उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांनी मॅग्नेट प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. डाळिंब तज्ज्ञ बी. टी. गोरे यांनी डाळिंब पिकांच्या उत्तम कृषि पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रावसाहेब बेंद्रे यांनी आभार मानले.कार्यशाळेमध्ये आटपाडी व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.