वार्षिक परीक्षा संपून सुट्ट्या सुरू झाल्या की जिकडे तिकडे उन्हाळी शिबिरांची रेलचेल सुरू होते. प्रत्येक ठिकाणी गायन, वादन, नाट्य, अभिनय, नृत्य, साहसी खेळ जसे ट्रेकिंग, स्विमिंग अशा विविध विषयांशी निगडित शिबिरांचे आयोजन केले जाते. पालक ही आपल्या मुलांना परीक्षा संपल्या की उन्हाळी शिबिरात दाखल करतात. खरंतर उन्हाळी सुट्टीत मुलांनी मस्त मजा करावी, मित्र मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळावे, बागडावे, मैदानी खेळ खेळावेत, आवडीची पुस्तके वाचावीत, मामाच्या गावाला किंवा खेडेगावात जाऊन निसर्ग अनुभवावा, गड किल्यांची भटकंती करावी. मुलांनी त्यांची सुट्टी एन्जॉय करावी.
पण असे करण्याऐवजी पालक आपल्या मुलांना उन्हाळी शिबीराच्या दावणीला बांधतात. मुलांचा कल, मुलांची आवड न पाहता पालक आपल्या मुलांना उन्हाळी दाखल करतात. वाढत्या स्पर्धेच्या युगात आपला मुलगा अभ्यासासोबतच इतर कलागुणांमध्येही मागे राहू नये म्हणून पालक आपल्या मुलांना उन्हाळी शिबिरात दाखल करतात पण ही उन्हाळी शिबिरं आपल्या मुलांसाठी किती उपयुक्त आहेत या उन्हाळी शिबिरांचा मुलांना खरंच उपयोग होतो का? याचा विचार मात्र पालक करीत नाहीत. उन्हाळी शिबिरातील मुलांच्या सुरक्षेबाबत आयोजक गंभीर आहेत का याचाही विचार पालकांनी करावा कारण तीन वर्षांपूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधी पुण्यात एका शिबिरात मुळशी धरणात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उन्हाळी शिबिरातील मुलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पालकांनीही आपल्या मुलांना उन्हाळी शिबिरात दाखल करण्यापूर्वी शिबिरातील सुरक्षा व्यवस्थेची खात्री केली पाहिजे. या शिबिरांना शासनाची मान्यता आहे का याचीही खात्री करायला हवी. सरकारनेही आयोजकांची क्षमता व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करूनच अशा शिबिरांना मान्यता द्यायला हवी. शिबिरादरम्यान जर काही दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेस आयोजकांनाच जबाबदार धरले पाहिजे. काही शिबिरांना मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असतो तर काहींना अल्प प्रतिसाद मिळतो अर्थात या शिबिरातून सर्वच गोष्टी शिकायला मिळतात असे नाही. याउलट वर्षभर चालणाऱ्या विविध शिबिरातून मुलांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुट्टीच्या दिवसातील शिबिरांना बऱ्यापैकी पैसे मोजावे लागतात. टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेममध्ये डोके खुपसून बसण्यापेक्षा पैसे जात असले तरी मुले गुंतून राहत असल्यामुळे पालक हाही खर्च सहन करतात. पालकांचा हेतू उदात्त आहे मात्र पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी जपाव्यात.आपल्याला हवे तसे नको तर मुलांना हवे ते देण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करावा. एकूणच या शिबिरांची आपल्या मुलांना कितपत गरज आहे याचा विचार करूनच पालकांनी आपल्या मुलांना उन्हाळी शिबिरात दाखल करावे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५