तासगाव : लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांना मारहाण केलेला तो व्हिडिओ वायफळे (ता. तासगाव) येथील नाही, असे स्पष्टीकरण तासगाव पोलिसांनी दिले आहे. हा व्हिडिओ इतर ठिकाणच्या कार्यक्रमाचा असून कोणीही तो सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी : वायफळे (ता. तासगाव) येथील घोडके मळ्यात काल (रविवारी) रात्री गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किरकोळ वादावादी वगळता हा कार्यक्रम शांततेत पार पडला. रात्री आठ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम बरोबर दहा वाजता बंद करण्यात आला होता.
दरम्यान कार्यक्रम झाल्यानंतर गौतमी पाटीलच्या ‘वायफळे येथील कार्यक्रमात हुल्लडबाजांना पोलिसांनी चोप दिला’, अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ वायफळे येथील नाही. गौतमी पाटीलच्या इतर ठिकाणच्या कुठल्या तरी कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.
वायफळे येथे पोलिसांनी कोणावरही लाठीचार्ज केला नाही. कोणालाही चोप दिला नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कोणीही सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये, असे आवाहन तासगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.