जत : जत तालुक्यातील उटगी येथे महावितरणची विनापरवागी परस्पर २ ट्रान्सफॉर्मरची उभारणी केल्याच्या कारणावरून संजय बाबर या ठेकेदारावर उमदी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार एका निनावी अर्जामुळे उघडकीस आल्याने मोठी जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.हा प्रकार उघड होताच महावितरणचे उमदी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता लक्ष्मणकुमार गुरव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस व महावितरणकडून मिळालेली अधिक माहिती अशी,कुठेही ट्रान्सफॉर्मर बसविण्या अगोदर महावितरणची रितसर मंजुरी घ्यावी लागते.अनुप इलेक्ट्रिकलचे ठेकेदार संजय बाबर यांचा महावितरण कार्यालयास निनावी अर्ज प्राप्त झाला होता.या अनुषंगाने सहाय्यक अभियंता लक्ष्मण कुमार गुरव यांनी शनिवारी २७ जून रोजी निनावी अर्जानुसार प्रत्यक्ष ठिकाण पाहणी केली.यावेळी मंजुरी न घेता परस्पर काम पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. 63 केव्ही मंजुरी असताना 100 केव्ही चा ट्रान्सफॉर्मर बसवल्याचा प्रकार आढळून आला आहे.त्यानुसार गुरव यांनी रितसर फिर्याद दिली आहे.