दरवर्षी जगातील कोट्याधीश लोकांची संख्या वाढत आहे. भारतातही ही संख्या वाढत आहे. भारतातील श्रीमंतांची संख्या दरवर्षी वाढत आहे इतकेच काय तर जगातील टॉप टेन श्रीमंतात भारतातील गौतम अदाणी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतिंचा समावेश आहे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. देशातील श्रीमंतांची संख्या जशी वाढत आहे तशी देश सोडून परदेशात स्थलांतरित होणाऱ्या श्रीमंतांची संख्या देखील वाढत चालली आहे हे देखील तितकेच खरे आहे. यावर्षी तब्बल सहा हजारांहून अधिक श्रीमंत देश सोडून परदेशात परागंदा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२३ मधून ही आकडेवारी समोर आली आहे.
जगभरातील संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतर यांच्यावर नजर ठेवण्याचे काम हेनले कडून करण्यात येते. याच संस्थेच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. गतवर्षी ही संख्या साडेसात हजार होती त्यामानाने यावर्षीची संख्या कमी असली तरी देशातून श्रीमंत का निघून जात आहेत हा प्रश्न पडतो. या देशात जन्मलेले इथेच लहानाचे मोठे झालेले इथेच उद्योगधंदा सुरू करून त्या जोरावर श्रीमंत होणारे उद्योगपती जेंव्हा अतिश्रीमंताच्या श्रेणीत पोहचतात तेंव्हा त्यांना भारतात राहावसे वाटत नाही ही चिंतनीय बाब आहे.
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा….
असे एककिडे म्हणायचे आणि दुसरीकडे आपल्या संपत्तीचा वापर आपल्या देशासाठी करण्याऐवजी परदेशासाठी करायचा ही मानसिकता श्रीमंतांमध्ये बळावत चालली आहे. आपल्या देशातून परदेशात स्थायिक होणारे श्रीमंत दुबई, अरब राष्ट्र,सिंगापूर, इंग्लंड आणि अमेरिकेला पसंती देतात. भारतापेक्षाही त्यांना हे देश राहण्यास योग्य का वाटतात याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे विशेषतः सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. श्रीमंत किंवा अतिश्रीमंत देश सोडून जात आहे यामागचे प्रमुख कारण भारतातील गुंतागुंतीची कररचना हे असल्याचे सांगितले जाते. भारतातील कररचना गुंतागुंतीची आहे अशी कुरकुर देशातील उद्योगपती करत असतात.
इतर देशातील कररचना भारताच्या मानाने सोपी आणि सुटसुटीत आहे तसेच कराबाबतचे नियम देखील लवचिक आहेत असे नियम आणि लवचिकता आपल्या देशात अवलंबणे गरजेचे आहे. दरवर्षी हजारो श्रीमंत देश सोडून जात आहे हे चित्र आपल्या देशाला भूषणावह नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपती परदेशात निघून जाणे भारतासारख्या विकसनशील देशाला परवडणारे नाही. कारण ते इथून निघून जात असताना त्यांच्या व्यवसाय क्षमता, रोजगार निर्माण करण्याची संधी, कर उत्पन्न करण्याची क्षमता आणि देशातील संपत्ती घेऊन जात असतात म्हणून देशातून श्रीमंत, अतिश्रीमंत देश सोडून जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५