शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नजीक, १० जणांची वर्णी, महिलांना संधी?

0

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. अधुनमधून चर्चा होण्यापलीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचे गाडे जराही पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील मंत्रिपदासाठी इच्छूक असलेले आमदार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. यासंदर्भात भाजपचे मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जवळपास १० नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाऊ शकते, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी दिली जाऊ शकते, याची दाट शक्यता आहे.

गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता शिवसेना आणि भाजप असे दोन पक्ष असल्यामुळे संभाव्य मंत्र्यांची नावे आणि खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. ही सगळी बोलणी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल. शिंदे गटातून कोणाला संधी मिळणार, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. तर भाजपमधून कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय आम्ही घेऊ. मंत्रिमंडळ विस्तारात फक्त १० जणांना सामावून घेतले जाणार असल्याने कोणालाही संधी मिळू शकते, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

गेल्या काही महिन्यांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी आवई अनेकदा उठली आहे. मात्र, त्यासंदर्भात ठोस असे काही घडले नव्हते. सुरुवातीला २ जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार, असे सांगितले गेले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख शिवसेनेच्या वर्धापन दिनापर्यंत म्हणजे १९ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आजदेखील मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी म्हणजे १७ जुलैपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल, असे समजते.

Rate Card

सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता शिवसेना-भाजपचे प्रत्येकी ९ मंत्री आहेत. शिंदे यांच्यावर मंत्रिपदासाठी जवळपास ३०आमदारांचा दबाव आहे. तर भाजपच्या उर्वरित ९६ आमदारांपैकी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा प्रश्न वरिष्ठ नेतत्त्वाला पडला आहे. गेल्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील अनेकांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी यापैकी कोणत्या आमदारांना मंत्रीपद मिळणार हे पाहावे लागेल. शिंदे-फडणवीस सराकरमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने टीकेचा सूर उमटला होता. त्यामुळे यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष प्रत्येकी किमान एका तरी महिला आमदाराला मंत्रिमंडळात सामावून घेतील, असा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.