जत : जत तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.त्यामुळे तातडीने शासनाने सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासनाला निवेदन देत केली आहे.जत तालुक्यात अवकाळी अगर कोणत्याही प्रकारे पाउस न झाल्याने जत तालुक्यात पिण्याचे पाणी जनावरांचा चारा यांचा प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाला आहे.त्याकरिता शासनाने त्वरित जत तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करावा लागणार आहे.जत तालुका कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने चालू वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे प्रश्न शासनास निदर्शनास आणून देणे अत्यंत गरजेचे आहे.चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.खरीप पिक वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्वसवलती देण्यात द्याव्यात तसेच सध्या जत तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना,चांदोली धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन जत तालुक्याकरिता सुरु करून जत तालुक्यातील पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.तसेच या आवर्तनाचे बिल टंचाई निधीतून भरणेत यावे.शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याकरिता शासनाकडून थेट अनुदान मिळावे.सध्या गाई,म्हशींच्या दुधाचे दर खूप कमी झाले आहेत.
या दुधदरात स्थिरता येणेसाठी शासनाने उपाययोजना कराव्यात.खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान मिळावे.पाणी टंचाई असणाऱ्या गावांना टॅकरद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करणेत यावा.जत नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना अमृत २.० अंतर्गत मंजुरीसाठी सादर केली असून त्यास तात्काळ मंजुरी देणेत यावी.सदरच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करणेत याव्यात अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन करणेत येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी,असे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना कॉग्रेसतर्फे देण्यात आले आहे.